पालघर : पालघर येथील पालघर सायकल मार्ट या प्रसिद्ध दुकानाचे मालक सुरेश बाबुराव पाटील (५६ वर्षे) यांनी शुक्रवारी पालघरच्या श्रीराम बिल्डिंग, रामकृष्णनगर या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यापूर्वी लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये एका माजी नगरसेवकासह अन्य एका व्यक्तीने कर्ज परत करण्याचा तगादा लावल्याने आपण आत्महत्या करीत असल्याचे नमूद केले आहे. यामुळे शहरात सर्वत्र खळबळ उडाली आहे.पालघर येथे ५०-६० वर्षांपासून राहणाऱ्या पाटील परिवाराचे पालघर सायकल मार्ट हे तालुक्यातील सर्व प्रकारच्या सायकली मिळण्याचे प्रसिद्ध दुकान होते. हीरो, अॅटलस या नामवंत कंपन्यांच्या सायकलींची एजन्सी त्यांच्याकडे होती. कालांतराने सुरेश पाटील यांनी आपला सायकलविक्रीचा वेगळा व्यवसाय सुरू केला. अंबामाता रोडजवळील आपल्या एका दुकानाची विक्री करून आणि एक दुकान भाड्याने देऊन त्याने भिवंडी येथे टायरचे दुकान सुरू केले आणि पालघर सोडून ते ठाणे येथे राहण्यासाठी निघून गेले. ३-४ दिवसांपूर्वी ते नेहमीप्रमाणे पालघरमध्ये आले. मात्र, गुरुवार रात्रीपासून ते मोबाइल उचलत नसल्याने त्यांच्या मुलाने पालघरमधील आपल्या एका मित्राला फोन करून वडिलांची चौकशी करण्यास सांगितले. आज सकाळी त्या मित्राने त्यांच्या फ्लॅटचा दरवाजा ठोठावला, पण काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्याने ड्युप्लिकेट चावीने दरवाजा उघडला असता स्वयंपाकघरात त्यांनी गळफास घेतल्याचे मित्राच्या निदर्शनास आले. त्याने तातडीने पोलिसांना कळवताच पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिली. (वार्ताहर)
सुरेश पाटील यांची आत्महत्या
By admin | Updated: February 20, 2016 01:47 IST