ठाणे : भिवंडीत रिक्षाचालकांकडून एसटीचालकाला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ शुक्रवारी ठाण्यात एसटीच्या कर्मचाऱ्यांनी अचानक कामबंद आंदोलन केले. यामुळे ठाणे आगार-१ आणि २ येथून सुटणारी एकही एसटी बस रस्त्यावर न उतरल्याने एसटी आगार आणि खोपट डेपोत बस उभ्या होत्या. मात्र, इतर ठिकाणांहून येणाऱ्या गाड्या ठाण्यातून पुढे गेल्या असल्या तरी, आंदोलनाचा फटका ३८ ते ४० हजार प्रवाशांना बसला. एसटीचे सुमारे २० लाखांचे नुकसान झाल्याची माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली. ठाण्यात निवडणुकीचे वातावरण असल्याने अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी वेळीच धाव घेऊन आंंदोलनकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु, कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने ग्रामीण आणि शहरी भागांत धावणाऱ्या दिवसभराच्या शेड्युलमधील सुमारे १८० गाड्या रस्त्यावर उतरल्याच नाहीत. यामुळे प्रवाशांचे हाल झाले. तर, दुसरीकडे मारहाण करणाऱ्या मारेकरी रिक्षाचालकाला अटक करून त्याला फाशी द्यावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी लावून धरताना, इतरही मागण्यांचे निवेदन दिले.एसटी बस स्थानकावरील व रस्त्यांवरील रिक्षा आणि खाजगी चालक यांची अरेरावी आणि त्यातच भिवंडी येथे एसटीचालक आणि रिक्षाचालकाशी वाद झाल्याने भिवंडी आगाराचे प्रभाकर गायकवाड या चालकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे त्याचा परिणाम आगारातील एसटीचालकांच्या मानसिकतेवर होऊन कर्मचाऱ्यांनी बंद पुकारला. हा बंद अचानक पुकारल्याने प्रवाशांचे हाल झाले. सकाळच्या पहिल्या फेरीपासून एकही बस न सोडण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला. त्यामुळे ठाणे आगार क्रमांक-१ आणि २ या शहरी आणि ग्रामीण भागांत धावणाऱ्या दिवसभरातील शेड्युलच्या सुमारे १९० बसेस रस्त्यावर न धावता तेथे उभ्या राहिल्या होत्या. (प्रतिनिधी) आगाराच्या मुख्य गेटपासून मुख्य रस्त्यापर्यंत, रस्त्याच्या कडेस दोन्ही बाजूंची खाजगी वाहने दूर करावीत. वंदना बस स्थानकात येणाऱ्या रिक्षांना प्रतिबंध करावा. वंदना आणि रेल्वे स्टेशन बस स्थानक, बोरीवली-भार्इंदर या ठिकाणी कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त मिळावा. संबंध नसताना चालकांना अपघात केसेसमध्ये गुंतवून कारवाई केली जाते. त्याची सखोल चौकशी करावी. भिवंडीत झालेल्या प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी. कर्मचाऱ्यांना सन्मानाने वागवावे आदी.या आगारांतून एकही बस धावली नाहीआगार क्रमांक-१ येथून सुटणाऱ्या बेळगाव, सातारा, जुन्नर, नगर, नाशिक, शिर्डी, ठाणे-पुणे, बागमांडळा, पिंपळोली आदी लांब मार्गांवरील बसेसप्रमाणे बोरीवली, भार्इंदर, तर आगार क्रमांक-२ येथून सुटणाऱ्या ठाणे-भिवंडी, पनवेल, मंत्रालय, कल्याण, विठ्ठलवाडी, वाडा, मुरबाड, शहापूर या मार्गांवर एकही बस धावली नाही.
एसटी कर्मचाऱ्यांचे अचानक आंदोलन
By admin | Updated: February 11, 2017 05:08 IST