- मुरलीधर भवारकल्याण : भीम चळवळींना एकेकाळी बुलंद साथ देणाऱ्या, भीमकोकिळा म्हणून संबोधल्या जाणा-या गायिका सुषमादेवी यांचा आवाज प्रसिद्धीपासून दूरवर फेकला गेला आहे. उतारवयात त्या अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जगत आहे. त्यांना हवा आहे मदतीचा हात. त्यांच्याकडे उरल्या आहेत केवळ त्यांच्या सुवर्णकाळातील आठवणी. दोन दिवसांपूर्वीच त्यांचे पती संगीतकार विश्वकांत महेशकर यांचे निधन झाले. त्या पार्श्वभूमीवर त्यांची हलाखीची परिस्थिती प्रकर्षाने समोर आली आहे.सुषमादेवी यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील जामखेडनजीकच्या एका खेड्यात झाला. वडील जगन्नाथ जावळे आणि आई वंचलाबाई यांना गाण्याची आवड होती. गाणी गाऊन ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. त्यांचे आईवडील तबलापेटी सोबत घेऊन गाणी गात कुटुंबासोबत फिरस्ती करायचे. लहानपणी गायनाचे धडे आईवडिलांकडूनच मिळाले. वयात आल्यावर त्यांच्या आईवडिलांनी त्यांचा विवाह केला आणि त्या जावळेच्या सुषमादेवी मोटघरे झाल्या. पुढे काही कारणास्तव त्या पतीपासून विभक्त झाल्या.१९७९ साली सुषमादेवी मुंबईला आल्या. त्यावेळी कश्मीरा कॅसेटस्टोन कंपनीने माझ्या भीमाच्या नावाचा कुंकू लाविला रमाने हे गाणे ध्वनिमुद्रित केल्यावर सुषमादेवी सर्वांना परिचित झाल्या. त्यानंतर, त्यांना अनेक गाणी मिळत गेली. या गाण्याच्या कार्यक्रमात वादक, गीतकार आणि संगीतकार विश्वकांत महेशकर यांच्याशी संपर्क आला. त्यांची गायनातील साथ आयुष्याच्या सोबतीत बदलली. सुषमादेवी व महेशकर यांनी लग्न केल्यानंतर ते कल्याणला राहण्यास आले.दरम्यान, सुषमादेवी यांचे अनेक संगीत कार्यक्रम विविध ठिकाणी होऊ लागले. कव्वाली हा प्रकार त्यांना चांगला अवगत आहे. भीमगीतांच्या कव्वालीचा सामना त्या रंगवू लागल्या. त्या काळातील गोविंद म्हशीलकर, प्रल्हाद शिंदे, नवनीत खरे, भीकू भंडारे यासारख्या आघाडीच्या कव्वाली गायकांसोबत त्यांचे संगीत कार्यक्रम होत होते. १९७९ ते १९९० हा सुषमादेवी यांचा सुवर्णकाळ होता. १९९५ नंतर त्यांची परिस्थिती खालावत गेली. त्यांचा एक मुलगा ब्रिजेश हा तबलावादक आहे. कार्यक्रमच मिळत नसल्याने त्यालाही आर्थिक चणचणीचा सामना करावा लागतो. कपिल नावाचा दुसरा मुलगा रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह कसाबसा करत आहे.सरकारकडून सुषमादेवींना केवळ १८०० रुपयांचे मानधनपर पेन्शन मिळते. मात्र, त्यातही सातत्य नसते. कल्याण पश्चिमेतील सिद्धार्थनगर रिक्षास्टॅण्डजवळ लहानशा खोलीत सुषमादेवींचा संसार कसाबसा सुरू आहे. ज्या समाजाच्या चळवळीसाठी त्यांनी आपल्या बुलंद आवाजात गाणी गायली, त्या सुषमादेवींकडे समाजाने पाठ फिरवणे कितपत योग्य आहे, असा सवाल त्यांची परिस्थिती पाहून उपस्थित होतो.गायनामुळे शिक्षणावर फेरले पाणीगायनाचे शास्त्रोक्त शिक्षण नसले तरी सुषमादेवींचा आवाज बुलंद होता. त्यांच्या पहाडी आणि स्पष्ट आवाजाला वळण मिळाले ते रोजच्या गाण्यातूनच. आईवडिलांचे औरंगाबाद, नागपूर येथे भीमगीतांचे कार्यक्रम नेहमी होत होते. त्यांच्यासोबत त्याही गात होत्या. गायनामुळे नियमित फिरस्ती असल्याने सुषमादेवी शिक्षण घेऊ शकल्या नाही.
भीमकोकिळेच्या नशिबी उपेक्षितांचे जीणे, बुलंद आवाज प्रसिद्धीपासून कोसो दूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2020 01:20 IST