ठाणे : ठाण्यात होत असलेल्या किंवा होणाऱ्या विकासकामांची घोषणा महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल किंवा अन्य अधिकाऱ्यांनी करू नये, तर त्यांची घोषणा शिवसेनेचे नेते किंवा महापौर हेच करतील, अशी सक्ती सुरू झाली आहे. नोकरशहांनी घोषणा केली तर त्याचे श्रेय मंत्रालयात बसलेले भाजपाचे नेते घेतील व त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर ‘करून दाखवलं’चा डंका पिटता येणार नाही, त्यामुळे ही मौनसक्ती लादल्याची चर्चा आहे.ठामपाची सार्वत्रिक निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे, तसतसे ठाण्यात श्रेयाचे राजकारण आणखी तापू लागले आहे. पालिकेच्या अनेक प्रकल्पांची घोषणा सत्ताधारी मंडळी करू लागली आहे. तीनहातनाका येथे राबवण्यात येणाऱ्या ग्रेड सेपरेटर, मनोरुग्णालय येथील विस्तारीत रेल्वे स्टेशन तसेच अंतर्गत जलवाहतूक या तीन महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे सादरीकरण नुकतेच केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी आणि रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना महापौर संजय मोरे, खासदार राजन विचारे, श्रीकांत शिंदे आणि महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केले. येत्या काळात ठाण्यासाठी होऊ घातलेल्या अनेक प्रकल्पांची घोषणा पालिका प्रशासन करणार होते. परंतु, त्यांच्याकडून अशा घोषणा करण्याचे अधिकारच सत्ताधारी शिवसेनेने काढून घेतल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)सारे काही जाहिराती आणि मतांसाठीमहापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत विकास हा कळीचा मुद्दा ठरणार असून सुशिक्षित ठाणेकर मतदान करताना तात्कालीक मुद्द्यांबरोबरच गेल्या पाच वर्षांतील कामांचा विचार करणार आहे. या प्रकल्पांना केंद्र व राज्य सरकार मंजुरी देणार असल्याने साहजिकच याचे श्रेय काही प्रमाणात भाजपाला जाऊन आपला मतांचा टक्का कमी होऊ शकतो, हे शिवसेनेने गृहीत धरले आहे. मात्र, निदान या प्रकल्पांची घोषणा प्रशासनाने न करता आपण केली तर त्याचे श्रेय घेण्याकरिता शिवसेना हे प्रकल्प आपल्या वचननाम्यावर हक्काने प्रसिद्ध करू शकते, असे त्या पक्षाच्या स्थानिक नेत्यांना वाटते.
‘करून दाखवलं’साठी मौनसक्ती
By admin | Updated: July 30, 2016 04:45 IST