उल्हासनगर : महापालिकेच्या पाच स्वीकृत नगरसेवकपदांसाठी तब्बल १९ अर्ज आले आहेत. शिवसेनेकडून सर्वाधिक १२ अर्ज आले असून भाजपाचे ४, साई पक्षाकडून १, तर दोघांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले आहेत. नगरसेवकांच्या एकूण संख्येनुसार शिवसेना व भाजपाचे दोन, तर साई पक्षाचा एक स्वीकृत नगरसेवक निवडून येणार आहे. ज्या चैनानी यांच्या घरी झालेल्या बैठकीवरून पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यात संघर्ष झाला, त्या चैनानी यांनी स्वीकृत सदस्यपद देत शिवसेनेने नवी खेळी खेळली आहे.महापौरपदाचे अर्ज ३० मार्चला दाखल झाल्यावर शुक्रवारी स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज पालिका आयुक्त सुधाकर शिंदे यांच्या उपस्थितीत दाखल झाले. महापालिकेत भाजपाचे ३२, साई पक्षाचे ११, शिवसेनेचे २५, राष्ट्रवादीचे ४, रिपाइंचे २, ओमी टीम-रासपचा १, काँॅग्रेस १, पीआरपी १, भारिप १ असे नगरसेवक निवडून आले. नगरसेवकांच्या संख्येनुसार भाजपा व शिवसेनेचे प्रत्येकी २, तर साई पक्षाचा एक स्वीकृत नगरसेवक निवडून येणार आहे. भाजपाच्या वतीने मनोज लासी, प्रदीप रामचंदानी, डॉ. कन्हैयालाल नाथानी, गणेश पाटील यांनी, तर शिवसेनेकडून तिरुपती रेड्डी, जयकुमार केणी, अॅड. विनोद जावळे, सुरेंद्र सावंत, डॉ. विजय पाटील, वर्षा आहुजा, राजकुमार चैनानी, जितू वलेचा, इंदर गोपलानी, अनिल तलरेजा, जितू चैनानी, अरुण आशान यांनी अर्ज दाखल केले आहेत.साई पक्षाच्या वतीने माजी महापौर आशा इदनानी यांनी, तर पालिकेचे माजी सचिव प्रकाश कुकरेजा, कमल भटिजा यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले. साई पक्षाच्या वतीने इदनानी यांचाच अर्ज आल्याने त्यांची निवड निश्चित समजली जाते. भाजपाकडून प्रदीप रामचंदानी व मनोज लासी यांच्या नावांवर पक्षश्रेष्ठींनी शिक्कामोर्तब केले. शिवसेनेच्या वतीने जयकुमार केणी, नीतू वलेचा यांची नावे पुढे आहेत. पालकमंत्री एकनाथ शिंदे तसेच राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी महापौरपदाची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. महापौर, उपमहापौरपदाचे अर्ज दाखल केल्यानंतर भाजपा व साई पक्षाचे नगरसेवक भूमिगत झाले आहेत शिवसेना, रिपाइं, राष्ट्रवादी, पीआरपी, काँग्रेसच्या नगरसेवकांनी शुक्रवारी पालघर जिल्ह्यातील रिसॉर्टचा सहारा घेतल्याचे समजते. साई पक्षाच्या फुटीर गटावर लक्ष ठेवण्यासाठी राज्यमंत्री चव्हाण यांनी विशेष पथक तैनात केल्याची चर्चा सुरू आहे. कलानींना सव्वा वर्षाने पद महापौरपदावरून ओमी कलानी टीममध्ये नाराजी पसरली. भाजपाने राजकीय डावपेच खेळत सव्वासव्वा वर्षासाठी महापौरपद वाटून दिले. पहिल्या सव्वा वर्षासाठी आयलानी, तर दुसऱ्या सव्वा वर्षासाठी पंचम कलानी महापौर असतील, अशी माहिती ओमी कलानी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. भाजपाच्या ३३ पैकी २१ नगरसेवक ओमी टीमचे समर्थक आहेत. (प्रतिनिधी) लाखोंची बोली महापालिकेत स्वीकृत नगरसेवक मिळवण्यासाठी लाखोंची बोली सुरू आहे. भाजपाने निष्ठावंत व प्रामाणिक कार्यकर्त्यांना डावलून गेल्या वेळचे स्वीकृत नगरसेवक लासी व रामचंदानी यांना पक्षाने प्राधान्य दिले. तर, शिवसेनेने महापौरपद प्रतिष्ठेचे केल्याने प्रामाणिक व निष्ठावंतांचा बळी देत मराठी व सिंधी समाजातील प्रत्येकी एकाला स्वीकृत नगरसेवकपद देणार आहेत.
स्वीकृत नगरसेवकांसाठी शिवसेनेची ‘चैनानी’ खेळी
By admin | Updated: April 1, 2017 06:05 IST