भिवंडी - तालुक्यातील शहरालगत असलेल्या शेलार ग्राम पंचायतीच्या वतीने सहा हजार नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले असल्याची माहिती सरपंच अ`ड किरण चन्ने यांनी गुरुवारी दिली.
कोरोना संकटावर मात करण्यासाठी शासकीय नियमांचे पालन करण्याबरोबरच नागरिकांचे लसीकरण होणे अत्यंत गरजेचे झाले आहे. मात्र लसीचा तुटवडा असल्याने अनेक नागरिकांना लस मिळत नाही. भिवंडीतील शेलार ग्रामपंचायतीने नागरिकांच्या आरोग्याची दखल घेत स्वतः पुढाकाराने गावातील ६००६ नागरिकांचे लसीकरण पूर्ण केले आहे. ज्यात ५१६९ नागरिकांना पहिला डोस तर ८३७ नागरिकांना लसीकरणाचा दुसरा डोस देण्यात आला आहे. ज्यात २० अपंग नागरिक, १८ गरोदर माता व ४४ स्तनदा मातांचा समावेश आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेलार गाव कोरोनामुक्त करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने सुरु केलेल्या प्रशस्त कोविड सेंटरमध्ये ३ वैद्यकीय अधिकारी, ६ नर्स, ४ वार्ड बॉय व ४ ऑनलाईन वर्कर अशा एकूण १३ कर्मचाऱ्यांची नियुक्ती ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात आली असल्याची माहिती सरपंच चन्ने यांनी दिली.
शेलार ग्रामपंचायतीने सुरुवातीपासून कोरोना नियमांचे काटेकोर पालन केले आहे. गावात स`निटायझर स्टॅन्ड, औषध फवारणी, स्वछता या सर्व बाबींची पूर्तता केलेली आहे. सध्या शेलार गावात कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात आली असल्याने शेलार कोविड सेंटरमध्ये तीन ठिकाणी लसीकरण सेंटर सुरु केले असून या सेंटरच्या बाजूलाच असलेल्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात देखील लसीकरणाची सोय केली आहे. तसेच स्वतंत्र बैठक व्यवस्था, चहा पाणी याची सुविधादेखील पंचायतीच्या वतीने केली असल्याची माहिती सरपंचचन्ने यांनी लोकमतला दिली.