आसनगाव : तालुका भाजपामध्ये अनेक वर्षांपासून सुरू असलेली अंतर्गत धुसफूस अजूनही कायमच आहे. खा. कपिल पाटील यांच्या मध्यस्थीनंतर आणि नवीन तालुकाध्यक्षांच्या निवडीनंतर तरी हे वाद संपतील, असा अंदाज होता. पण तसे न झाल्याने विद्यमान तालुकाध्यक्षांच्या माथी अकार्यक्षमतेचा ठपका ठेवत अखेर शहापुर तालुकाध्यक्ष बदलाचा निर्णय जिल्हाध्यक्षांनी घेतला आहे. विद्यमान तालुकाध्यक्ष सुभाष हरड यांनी वर्षभरानंतर नियुक्त केलेल्या तालुका कार्यकारीणीलाही चोरघे यांनी जाहीररित्या स्थगिती दिल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिल्याने शहापुर भाजपमधील धुसफूस आता चव्हाट्यावर येऊ लागली आहे. नुकत्याच झालेल्या महापालिका तसेच जि.प. निवडणुकीत भाजपाने चांगली बाजी मारली असली तरी गेल्या महिन्यात झालेल्या कोकण विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला. या निवडणुकीत भाजप उमेदवाराचे काम न करता अपक्ष उमेदवार रामनाथ मोते यांचा प्रचार केल्याचा ठपका तालुकाध्यक्ष सुभाष हरड यांचेवर ठेवला होता. तर वर्षभराचा कालावधी लोटूनही तालुका कार्यकारिणी स्थापन करण्यात हरड यांना अपयश आल्याचा ठपका ठेवत जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष दयानंद चोरघे यांनी तालुकाध्यक्ष बदलाचे संकेत देत निवड अटळ असल्याचे सांगितले. (वार्ताहर)
शहापूर भाजपातील दुफळी चव्हाट्यावर
By admin | Updated: March 22, 2017 01:24 IST