भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेने नोटाबंदीच्या निर्णयानंतर ९ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर २०१६ दरम्यान सुमारे ७५ कोटींची करवसुली केली. या कराचा भरणा करण्यासाठी पालिकेने मोहीम राबवली होती. वेळोवेळी आवाहन तसेच पाणीपुरवठा खंडित करण्याची कार्यवाही करूनही ज्यांनी अद्याप कराचा भरणा केलेला नाही, अशा २ हजार ७२७ थकबाकीदारांना कर विभागाने जप्तीच्या अंतिम नोटिसा बजावल्या आहेत. करवसुलीसाठी विद्यार्थी व शिक्षकांमार्फत घरोघरी जाऊन मोहीम राबवण्यात आली. तसेच प्रभागनिहाय पथके तयार केली. पथकाला थकबाकीदारांच्या दारी धाडले. थकबाकीदारांना कराचा भरणा करण्यासाठी प्रवृत्त करून तेथेच कराची वसुली पथकाद्वारे सुरू करण्यात आली. अनेकदा आवाहन करूनही ज्या मालमत्ताधारकांनी कराचा भरणा केला नाही, अशा थकबाकीदारांचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला. थकबाकीदारांकडे सुमारे ६५ कोटींहून अधिक कर थकीत असल्याचे सांगण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
पालिकेच्या २७२७ जणांना जप्तीच्या नोटिसा
By admin | Updated: February 10, 2017 04:02 IST