वसई : वसई गावातील एका अल्पवयीन मुलीला फूस लावून तिला उत्तरप्रदेशात पळवून नेणाऱ्या तरुणाला तब्बल आठ महिन्यांनी अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले. अपहरण आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करून तरुणाला अटक करण्यात आली आहे. तर मुलीला वैद्यकीय उपचारासाठी सरकारी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मुलीच्या आईने त्यासाठी तब्बल आठ महिने पोलिसांशी संघर्ष करावा लागला होता.वसई गावातील झेंडाबाजार येथे राहणाऱ्या एका गरीब कुटुंबातील फरजाना शेख यांनी आपल्या १६ वर्षाच्या मुलीला याच परिसरात काही दिवसांपूर्वी रहावयास आलेल्या सद्दाम अन्सारी (२२) याने १९ आॅक्टोबर २०१५ रोजी फूस लावून पळवून नेल्याची तक्रार वसई पोलीस ठाण्यात केली होती. पोलिसांनी मात्र प्रेम प्रकरणातून मुलगी पळाली असल्याचे कारण पुढे करीत दुर्लक्ष केले होते. मात्र, फरजाना यांनी आपल्या मुलीच्या शोधासाठी पोलिसांशी संघर्ष सुरु केला. स्थानिक पोलीस दाद देत नसल्याने फरजाना यांनी वरिष्ठांचेही उंबरठे झिजवले होते. शेवटी वरिष्ठांकडून आदेश आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. सद्दामला शोधण्यासाठी पोलीस पथक तीनवेळा उत्तरप्रदेशातही जाऊन आले. दुसरीकडे सद्दामने त्या मुलीशी लग्न करून ती २० वर्षांची असल्याचा खोटा दाखला तयार करून अलाहाबाद उच्च न्यायालयात सादर केला होता. मात्र, फरजाना यांनी सदरचा दाखला खोटा ठरवून खरा दाखला सादर केल्यानंतर सद्दाम त्या मुलीला घेऊन पळाला होता. शेवटी पोलिसांनी सद्दामला गोरखपूर जिल्ह्यातील एका गावातून ताब्यात घेतले. (प्रतिनिधी)
अल्पवयीन मुलीचा आठ महिन्यांनी शोध
By admin | Updated: June 25, 2016 01:27 IST