ठाणे : शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी फिरत्या सिग्नल शाळेसह, पालिकेच्या शाळामध्ये मुलींसाठी प्रत्येकी दोन स्वतंत्र शौचालये, शाळा-मैदानांना संरक्षण भिंत उभारणे, सीसीटीव्हीची नजर, ई लर्निंग अशी वैशिष्ट्ये असलेला शिक्षण विभागाचा अर्थसंकल्प मंगळवारी सादर झाला. महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उचांवण्यासाठी विविध महत्वांकाक्षी योजनेसह अभिनव योजनांचा समावेश या ३७ कोटी ११ लाखांच्या अर्थसंकल्पात आहे. ठाणे महापालिका शिक्षण विभागातर्फे यंदा महापालिका शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांसाठी विविध योजनाही राबविण्यात येणार आहेत त्यात आर. के. लक्ष्मण कला-क्र ीडा प्रबोधीनीसाठी ५० लाख, एखाद्या विद्यार्थ्याचा शाळेच्या ठिकाणी अथवा प्रवासादरम्यान अपघात झाल्यास त्याला विम्याचे संरक्षण दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या अपघात विमा योजनेसाठी १५ लाख, एकलव्य रात्रशाळा योजनेसाठी १० लाख, आर्यभट्ट डिजीटल माध्यमिक शाळा योजनेसाठी २ कोटी, डॉ. होमी भाभा टॅब योजनेसाठी ३ कोटी, सिग्नल शाळा योजनेसाठी २५ लाख, अनुताई वाघ बालउत्कर्ष योजनेसाठी एक कोटी ५० लाख, शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणासाठी १० लाख, कल्याण फाटा येथील जकातनाक्याचे शाळेत रुपांतर करण्यासाठी ४० लाख, पीपीपी योजनेतून उच्च माध्यमिक शाळेच्या उभारणीसाठी ०५ लाख, गोपाळ गणेश आगरकर सेमी इंग्लिश स्मार्ट स्कूल योजनेसाठी ५० लाख, डॉ. अब्दुल कलाम व्हर्च्युअल क्लासरूम योजनेसाठी एक कोटी ५० लाख, राजमाता जिजाऊ कृतियुक्त अध्ययन पद्धती योजनेसाठी एक कोटी ५० लाख, सुरक्षित शाळा प्रकल्पासाठी एक कोटीची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. इतर योजनांसाठी २२ कोटी ५५ लाख रु पये प्रस्तावित करण्यात आले आहेत. एकंदरीत यंदा शिक्षण विभागाचा अर्थसंकल्प स्मार्ट विद्यार्थी निर्माण करण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आला आहे.
ठाण्यात सुरू होणार सिग्नलवरही शाळा
By admin | Updated: February 17, 2016 02:04 IST