वडखळ : पेण तालुक्यातील पहिली डिजिटल शाळा होण्याचा बहुमान रायगड जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमाच्या बोरी येथील शाळेला मिळाला आहे. बोरी शाळेच्या शतकोत्तर महोत्सवी कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्र माचे औचित्य साधून मराठी शाळांना लागलेली गळती थांबावी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना डिजिटल संगणकीय शिक्षणाचा लाभ मिळावा या उद्देशाने बोरी ग्रामस्थांनी व शाळा व्यवस्थापन कमिटीने जे. एस. डब्लू. कंपनीच्या सहकार्याने शाळेत संगणक प्रोजेक्टर बसविल्याने येथील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण मिळणार आहे.आधुनिक युगातही ग्रामीण भागातील मराठी शाळा टिकल्या पाहिजेत, येथील मुलांना डिजिटल शिक्षण मिळाले पाहिजे या उद्देशाने ही शाळा डिजिटल करण्यात आली आहे. या शाळेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून इतर शाळाही डिजिटल करण्यात याव्या असे आवाहन शिवसेनेचे पेण विधानसभा मतदार संघ प्रमुख अविनाश म्हात्रे यांनी केले. यावेळी बोरी परिसरातील निवृत्त शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. या वेळी अनेक शिक्षकांच्या भावना अनावर होवून त्यांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला. येथील विद्यार्थ्यांना आधुनिक डिजिटल शिक्षण मिळणार असल्याने येथील ग्रामस्थ, विद्यार्थी व शिक्षकांनी समाधान व्यक्त केले.यावेळी जे. एस. डब्लू.चे जनसंपर्क अधिकारी आत्माराम बेटकेकर, पतंगराव कदम कॉलेजचे प्राचार्य बाबासाहेब दधाळे, शिक्षण विस्तार अधिकारी शिल्पा पवार आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)
बोरी येथील शाळा झाली डिजिटल
By admin | Updated: November 9, 2015 02:28 IST