प्रज्ञा म्हात्रे, ठाणेरत्नागिरीनंतर आता पुढील स्वा. सावरकर साहित्य संमेलन ठाण्यात होणार आहे. अ. भा. मराठी साहित्य संमेलन, अ. भा. मराठी नाट्य संमेलनानंतर स्वा. सावरकर साहित्य संमेलनाचा मानही ठाण्याला मिळाला आहे. ठाण्यात प्रथमच हे संमेलन होत असून संमेलनाच्या तारखा मात्र लवकरच जाहीर केल्या जाणार आहेत. ठाणे शहराला सांस्कृतिक वारसा लाभला आहे. सांस्कृतिक चळवळीत ठाण्याचे मोठे योगदान आहे. या सांस्कृतिक नगरीत २०१० साली ८४ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन पार पडले, तर २०१६ साली ९६ वे अ. भा. मराठी नाट्य संमेलन झाले. आता २०१७ साली २९ वे अ.भा. स्वा. सावरकर साहित्य संमेलनही पार पडणार आहे. आतापर्यंत महाराष्ट्राबाहेर गोवा, हैदराबाद, गुजरात यासारख्या ठिकाणी हे संमेलन झाले आहे. खरेतर, २८ वे स्वा. सावरकर साहित्य संमेलन हे ठाण्यात होणार होते. परंतु, नाट्य संमेलनामुळे ते रद्द करण्यात आले होते. आतापर्यंत ठाण्यात सावरकर साहित्य संमेलन झाले नसून प्रथमच होत आहे, अशी माहिती स्वा. सावरकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष विद्याधर ठाणेकर यांनी दिली. सावरकर आणि ठाण्याचा जवळचा संबंध होता. त्यांची सासुरवाडी ठाणे जिल्ह्यातील होती. त्यांच्या आयुष्यातील शेवटचे भाषण ठाण्यात झाले होते. तर, अंदमानला पाठवण्यापूर्वी त्यांना ठाणे जेलमध्ये ठेवले होते, अशी माहितीही त्यांनी दिली. तीन दिवस रंगणारे हे संमेलन फेब्रुवारी किंवा मार्च या महिन्यात होण्याची दाट शक्यता असून संमेलनाच्या तारखांबरोबर ठिकाणही लवकरच निश्चित होणार आहे. यासंदर्भातील बैठक मुलुंड येथे गुरुवारी पार पडली.
सावरकर साहित्य संमेलन होणार ठाण्यात
By admin | Updated: July 25, 2016 02:55 IST