मुंबई : कुठल्याही प्रकारची समीक्षा आजच्या काळात सर्व वृत्तपत्रांमधून लोप पावत चालली आहे. बौद्धिक दहशतवाद गेली ५० वर्षे महाराष्ट्रात राज्य करीत आहे. समीक्षेला छाट देणे लोकशाहीला बाधक असून, त्या ठिकाणी फक्त ठोकशाहीचे अस्तित्व असते, असे प्रतिपादन चित्रपट अभ्यासक आणि दिग्दर्शक अरुण खोपकर यांनी केलेमॅजेस्टिक पब्लिशिंग हाउस आणि सुभाष भेंडे कुटुंबीय यांच्या सहयोगाने देण्यात येणारा ‘सुभाष भेंडे नवोदित लेखक’ पुरस्कार या वर्षी गणेश मतकरी यांच्या ‘सिनेमॅटिक’ या समीक्षा ग्रंथाला देण्यात आला. ११ हजार १११ रुपये आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. लोकशाही समाजाबद्दलची अतिशय तळमळ, भान तसेच सिनेमाध्यमाचे सर्व बाजूने अवधान असणे गरजेचे असते. हे अवधान गणेश मतकरी यांच्या लेखणीत आहे. अशा प्रकारची समीक्षा करण्याचे समग्र भान गणेश मतकरी यांच्या ठायी आहे, अशा शब्दांत लेखकाबद्दलचे विचार अरुण खोपकर यांनी व्यक्त केले.समीक्षेच्या पुस्तकाला पुरस्कार मिळणे हे सकारात्मक आहे. वृत्तपत्रीय समीक्षा मजबूत झाली तर इतर प्रकारची समीक्षाही चांगली होईल. चित्रपट कसा पाहावा, याबाबत दिशा नसल्याने तो वरवर पाहिला जातो़ त्यासाठी दिशादर्शक लेखन होणे आवश्यक आहे. केवळ करमणूक म्हणून न पाहता त्याचा अन्वयार्थ लावणे आणि प्रेक्षकांना विचार करायला लावणेही तेवढेच आवश्यक असल्याचे मत गणेश मतकरी यांनी या वेळी व्यक्त केले. (प्रतिनिधी)