कल्याण : केडीएमसीतील दोन नगरसेवकांच्या समर्थकांमध्ये शनिवारी पुन्हा हाणामारी झाली. या वेळी पोलिसांनी त्यांना पिटाळून लावण्यासाठी लाठीमार केला. त्यानंतर, बहुतांश नगरसेवकांच्या गाड्यांची पोलिसांनी तपासणी केली. त्यात काही नगरसेवकांच्या गाड्यांमध्ये बंदुका, हॉकी स्टीक आणि दंडुके आढळली असून पोलिसांनी तीजप्त केली आहेत. त्याचबरोबर गाड्यांच्या काचांवरील काळ्या फिल्म फाडून नगरसेवकांकडून जागेवर २०० रुपये दंड वसूल करण्यात आला.महासभा सुरू असताना शिवसेनेचे नगरसेवक महेश गायकवाड व भाजपाला समर्थन देणारे अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांच्या समर्थकांमध्ये महापालिका आवारात हाणामारी झाली. मात्र, महापालिकेच्या सुरक्षारक्षकांनी बघ्याची भूमिका घेतली. मागील महासभेच्या वेळीही असा प्रकार घडल्याने शनिवारी महापालिका आवारात पोलीस बंदोबस्त होता. नगरसेवकांच्या समर्थकांत हाणामारीला सुरुवात होताच पोलिसांनीत्यांना लाठीमार करत त्यांना महापालिका आवाराबाहेर पिटाळले. महासभा संपल्यानंतर सर्व नगरसेवक महापालिकेबाहेर पडले. त्यावेळी हाणामारीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नगरसेवक गायकवाड यांची गाडी तपासली असता त्यात हॉकी स्टीक आणि मिरचीपूड सापडली. काँग्रेसचे माजी नगरसेवक सदाशिव शेलार यांच्या गाडीत रायफल आढळली. ही कारवाई सुरू असताना वाहतूक पोलीस व शहर पोलिसांनी नगरसेवकांच्या गाड्यांच्या काचांवर लावलेल्या काळ्या फिल्म ब्लेडने फाडून काढल्या. काही नगरसेवकांच्या गाड्याही जप्त केल्या आहेत. जप्त केलेल्या रायफलचा परवाना आहे का, हेही तपासले जाणार आहे. परवाना असल्यास रायफल परत केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले.शिवसेना नगरसेवक दीपेश म्हात्रे व गणेश कोट यांच्या गाड्यांच्या काचांवर काळी फिल्म होती. त्यावर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप सूर्यवंशी यांनी कारवाई करताच म्हात्रे व सूर्यवंशी यांच्यात शाब्दिक चकमक झाली. नगरसेवक मल्लेश शेट्टी यांनीही पोलिसांच्या या कारवाईस विरोध केला. पोलिसांसोबत त्यांचीही बाचाबाची झाली. या प्रकाराची गंभीर दखल घेत पोलीस उपायुक्त संजय शिंदे यांनी महापालिकेत धाव घेतली. (प्रतिनिधी)
नगरसेवक समर्थकांत पुन्हा राडा
By admin | Updated: March 26, 2017 04:36 IST