ठाणे : तौत्के वादळानंतर शहरात ठिकठिकाणी उन्मळून पडलेल्या झाडांच्या फांद्या अजूनही तशाच पडून असून, याचे तीव्र पडसाद शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. पावसाळा तोंडावर असताना फांद्याछाटणीच्या कामाला गती मिळाली नाहीच मात्र, ठेकेदाराला वाढीव दर मिळावा यासाठी पाच दिवस काम बंद ठेवले होते, असा आरोप शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे यांनी केला. संबंधित ठेकेदारांची मुदत संपल्यानंतरही उशिरा निविदा प्रक्रिया सुरू केल्याने वृक्षप्राधिकरणाच्या कारभाराचे वाभाडे या बैठकीमध्ये काढण्यात आले.
तौत्के वादळामुळे शहरात झाडांचे मोठे नुकसान झाले असून, अनेक ठिकाणी प्रभागात झाडांच्या फांद्या तशाच पडून आहेत. काही ठिकाणी तर नागरिकांना चालणेदेखील कठीण झाले आहे. यासंदर्भात नगरसेवक तसेच नागरिक वारंवार तक्रारी करत असतानाही त्यांची दाखल घेतली जात नाही. याबाबत रेपाळे यांनी थेट प्रशासनाचा गलथान कारभारावरच टीका केली. शहरात एकीकडे अनेक ठिकाणी फांद्या तशाच पडून असून त्या का उचलल्या नाहीत असा प्रश्न त्यांनी केला. तसेच ठेकेदाराला वाढीव दर मिळावा यासाठीच पाच दिवस काम बंद ठेवले होते, असा आरोपही केला. यावर मन्युष्यबळ कमी असल्याने काम बंद असू शकते, असे उत्तर प्रशासनाने दिले. तर ३१ मे रोजी ठेकेदाराची मुदत संपली असून, निविदाप्रक्रिया सुरू केल्याचेही प्रशासनाने यावेळी स्पष्ट केले. मात्र, ३१ मे रोजी जर मुदत संपली होती, तर आधीच ती का राबविली नाही? असा प्रश्न सदस्यांनी केला.
५१८ झाडांच्या फांद्या कापणार
फांद्या तोडण्यासंदर्भात निविदाप्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, येत्या दोन दिवसांत कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. यामध्ये आतापर्यंत २१८ झाडांच्या फांद्या तोडण्यात आल्या असून, शहरातील ५१८ झाडांच्या फांद्या तोडाव्या लागणार आहेत. येत्या दोन ते तीन दिवसांत हे काम पूर्ण होईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.