उल्हासनगर : रस्त्यातील खड्डे पावसाळ्यापूर्वी बुजवण्यासाठी साडेतीन कोटींची तरतूद केली आहे. मात्र, निविदा न उघडल्याने खड्डे बुजवले नाही. त्यामुळे नागरिकांवर ऐन पावसाळ्यात खड्ड्यांतून वाट काढावी लागणार आहे.उल्हासनगर महापालिकेने नालेसफाईसाठी १ कोटी ६७ लाख, तर रस्त्यांतील खड्डे व पुनर्बांधणीसाठी साडेतीन कोेटींची तरतूद अंदाजपत्रकात केली. दोन्ही कामांच्या निविदा उघडण्याच्या दिवशी विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने काम खोळंबणार, असे बोलले जात होते. अत्यावश्यक कामे असल्याने त्या कामांना मंजुरी द्या, असे साकडे आयुक्त मनोहर हिरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना घातले होते.न्यायालयाने ३१ मे पूर्वी नालेसफाईचे आदेश महापालिकांना दिले. त्यानुसार, जिल्हाधिकारी यांनी नालेसफाईच्या कामाला मंजुरी देताच पालिकेने निविदा उघडून नालेसफाईच्या कामाला सुरुवात झाली. मात्र, पावसाळ्यापूर्वीच्या रस्ते-खड्डे दुरुस्तीचे काम रखडणार आहे. अद्यापही निविदा न उघडल्याची माहिती शहर अभियंता जितेंद्र जैस्वाल यांनी दिली आहे.गेल्या वर्षी तांत्रिक कारणामुळे पावसाळ्यापूर्वी रस्त्यांतील खड्डे बुजवले नव्हते. पावसाळ्यात रस्त्यांची चाळण झाल्यावर, अपघात वाढल्यावर रिक्षाचालक मालक संघटनेसह मनसेने आंदोलन केले. पालिकेला ऐन पावसाळ्यात नाइलाजाने खड्डे बुजवण्याचे काम हाती घ्यावे लागले होते. ती वेळ येऊ नये, म्हणून रिपाइं नेते नाना बागुल व मनसेचे शहराध्यक्ष प्रदीप गोडसे, संजय घुगे यांनी आत्ताच खड्डे बुजवण्याची मागणी केली आहे.
खड्ड्यांतूनच काढा ‘वाट’
By admin | Updated: June 3, 2016 01:50 IST