ठाणे : घटस्फोटित महिलांच्या समस्या, हुंडापद्धती, नवऱ्याचा जाच असे वर्षानुवर्षे सुरू असलेल्या आणि आजही समाजात दिसणाऱ्या गंभीर प्रश्नांना वंचित घटकांमधीलच महिलांनी आपल्या नाटकातून वाचा फोडण्याची केलेली हिंमत, दिग्गज कलावंतांपेक्षाही सरस होत केलेला साधा मात्र सहज अभिनय आणि त्याला प्रेक्षकांसह मान्यवर कलावंतांनी टाळ्यांच्या कडकडाटात दिलेली कौतुकास्पद दाद अशा उत्साही वातावरणात शनिवारी वंचित महिलांचा नाट्यजल्लोष टाउन हॉलच्या खुला रंगमंचावर रंगला. या कौतुकाने काही महिला कलावंतांना आपले अश्रूही अनावर झाले. समता विचार प्रसारक संस्था आयोजित वंचित महिलांचा नाट्यजल्लोष रविवारी रंगला. विविध विभागांतील ७ महिला गटांनी नाटिका सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. माजिवडा विभागाने घटस्फोटित स्त्रीची समस्या ही सत्यघटनेवर आधारित घटना ‘स्वाभिमान.कॉम’ या नाटकातून दाखवली. सावरकरनगर गटाने ‘रि-युनियन’ या नाटिकेतून पतीमुळे झालेली घुसमट मैत्रिणींच्या पाठिंब्यामुळे उडवून देण्याचे ठरवते, हा विषय मांडला. आझादनगर येथील हिंदी भाषिक महिलांनी ‘दहेज-एक-अभिशाप’ ही हुंड्याच्या वाईट चालीवरील नाटिका सादर केली. मनोरमानगर गटाने महिलांच्या मासिकपाळीबद्दल समाजात रूढ असलेल्या गैरसमजावर आधारित ‘आता तुमची पाळी’ ही नाटिका उत्तमरीत्या सादर केली. नवशीबाई कम्पाउंड गटाने एका विकल्या गेलेल्या परप्रांतातील मुलीचे आयुष्य काही स्त्रियांच्या मदतीने कसे सावरते आणि सामाजिक बांधीलकी कशी जपली गेली, ती सत्यघटनेवर आधारित ‘एक अस्तित्व’ नाटिका सादर केली. किसननगरमधील महिलांनी सादर केलेल्या ‘वाट’ या नाटिकेत अमेरिकास्थित मुलगा परत येऊन आईची सर्व मालमत्ता हडप करून तिला कसे निराधार सोडतो, ती व्यथा मांडली. तर, मानपाडा येथील एकलव्यमधील मुलांनी स्त्री-पुरु ष समतेवर विनोदी नाटिका सादर केली.सहभागी कलावंतांना अनुबंध संस्था, कल्याण यांच्यातर्फे भेट देण्यात आली. सर्व गटांना महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि पारितोषिकही देण्यात आले. या कार्यक्रमाला महापालिका सभागृह नेते नरेश म्हस्के, या रंगमंचाचे संस्थापक, ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी, दिग्दर्शक रवी जाधव, मेघना जाधव, प्रसिद्ध कलाकार सविता दळवी, विशाखा देशपांडे तसेच संस्थेचे अध्यक्ष संजय मंगला गोपाल, विश्वस्त जगदीश खैरालिया, रोटरियन अर्जुन मुड्डा, नाट्यजल्लोषच्या संयोजिका बोरकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)गरीब वस्तीतील तरुण मुलांच्या वाढत्या शारीरिक ऊर्जेला वाममार्गाला जाण्यापासून थांबवण्यासाठी आणि योग्य वळण देण्यासाठी वस्त्यावस्त्यांमध्ये क्र ीडा केंद्र उभारावे, अशा आशयाचे निवेदन महापौरांना देण्यात आले. या बाबी अमलात आणण्यासाठी आवर्जून प्रयत्न करीन, असे आश्वासन महापौर शिंदे यांनी दिले.
वंचित महिलांचा उल्लेखनीय कलाविष्कार
By admin | Updated: April 1, 2017 05:22 IST