ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात उभारलेल्या मोबाइल टॉवर्सचा सुमारे २२ कोटींचा थकीत मालमत्ताकर रिलायन्स कंपनीने न भरल्याने पालिकेने गुरुवारपासून हे टॉवरच सील करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कंपनीच्या विरोधात याचिका दाखल करण्यासाठीदेखील हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे ठाण्यात आता रिलायन्सचे नेटवर्क गायब होणार असल्याची चिन्हे आहेत. याचबरोबर रिलायन्सचे प्रमुख अंबानी यांच्याविरोधात अवमान याचिका दाखल करणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिली.ठामपा क्षेत्रात रिलायन्स कंपनीमार्फत जवळपास ८० ठिकाणी इमारत व जमिनीवर मोबाइल टॉवर उभारण्यात आले आहेत. त्याबदल्यात त्यांच्याकडे एकूण २२ कोटींची थकबाकी प्रलंबित आहे. उच्च न्यायालयानेही प्राधान्याने थकीत रक्कम ठामपाकडे भरण्याचे आदेश रिलायन्सला दिले होते. मात्र, कंपनीने मालमत्ताकराची देय रक्कम अद्यापही न भरल्याने महापालिकेने अखेर कंपनीकडील मालमत्ताकर वसूलीसाठी महापालिका अधिनियमांतर्गत जप्तीची कारवाई सुरू केली आहे. तरीही रिलायन्सकडून कोणतीही हालचाल न झाल्याने महापालिकेने आता या कंपनीचे टॉवरच सील करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, गुरुवारपासून ही कारवाई सुरू होणार आहे. (प्रतिनिधी)
रिलायन्सचे नेटवर्क ठाण्यातून होणार गायब
By admin | Updated: March 23, 2017 01:28 IST