अनिकेत घमंडी/लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली: जवळचे भाडे नाकारणे, प्रवाशांसोबत उद्धट वर्तन करणे, मनमानी भाडे आकारणे असा खोडसाळपणा करणाऱ्या उद्दाम रिक्षाचालकांच्या मुजोरीचा बिमोड करण्याकरिता डोंबिवलीतील काही नागरिकांनी व्हॉटसअॅपचा ग्रुप तयार केला आहे. ग्रुपमधील कोणात्याही सदस्याला रिक्षा चालकाचा कटू अनुभव आल्यास तातडीने त्याने तो शेअर करावा, लागलीच त्या रिक्षाचालकाचा समाचार घेण्याकरिता आजूबाजूला असलेले ग्रुप सदस्य धावून येतील, असा यामागील हेतू आहे. त्यामुळे एकट्यादुकट्या प्रवाशाला रिक्षावाल्यांनी एकत्र जमून बुकलून काढण्याचा प्रयत्न केल्यास आता रिक्षावाल्यांशी दोन हात करायला प्रवासीही रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत.रिक्षाव्ाांल्यांच्या मुजोरीच्या विरोधात एल्गार पुकारण्याकरिता दोन दिवसांत तयार झालेल्या या व्हॉटसअॅप ग्रुपचे अडीचशेहून अधिक सदस्य झाले आहेत. आणखी प्रवाशांनी या ग्रुपमध्ये सहभागी होण्याची तयारी दाखवली तर वेळप्रसंगी असे आणखी काही ग्रुप तयार केले जातील व एकाचवेळी हजारो प्रवाशांपर्यंत रिक्षावाल्याच्या मुजोरीचा प्रकार पोहोचवून प्रतिकाराची वज्रमूठ घट्ट केली जाणार आहे. व्हॉटसअॅप ग्रुपच्या सदस्यांची तातडीची एक बैठक बोलवावी, असे आवाहन काही सदस्यांनी केले.
रिक्षाचालकांशी दोन हात करण्यास प्रवासी सज्ज!
By admin | Updated: July 7, 2017 06:30 IST