लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : गेल्या तीन-चार दिवसात वाढलेल्या तापमानातून काहीसा दिलासा मिळेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. आठवडाभर ढगाळ वातावरण राहणार असले, तरी बुधवारनंतर पावसाच्या तुरळक सरी कोसळण्याची आणि त्यामुळे काहिलीतून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. राज्याच्या काही भागात सध्या वळवाच्या सरी कोसळत आहेत. तसाच अनुभव येत्या आठवडाभरात ठाणे जिल्ह्यातील नागरिकांनाही येण्याची शक्यता आहे.गेले चार दिवस तापमानाचा पारा ४१ अंशांपर्यंत पोचतो आहे. कमी झालेली झाडे आणि काँक्रिटच्या रस्त्यांमुळे तापमानवाढ अधिक जाणावत असल्याचे पर्यारवरणवाद्यांचे म्हणणे आहे. सकाळी ११ ते दुपारी अडीच-तीनपर्यंत तापमान सरासरी ३७ ते ३८ अंश सेल्सियस असले तरी प्रत्यक्षात त्या काळात तापमानाचा पारा ४१ अंशांवर पोचत असल्याच्या हवामना विभागाच्या नोंदी आहेत. परिणामी दुपारच्या काळात बाहेर पडणेही नकोसे होते.लोकल, बस तसेच रिक्षातून दुपारच्या वेळी प्रवास करणारे प्रवासी उन्हाच्या झळांमुळे त्रासून जातात. त्यातच काही भागांत अघोषित भारनियमनामुळे आधीच उकाडा असह्य झालेल्यांच्या हालाला पारावर उरत नाही. ग्रामीण भागात यानिमित्ताने सहा-सहा तास वीजपुरवठा बंद राहतो आहे. येत्या आठवड्यातही उन्हाचा कडाका कमी होण्याची कोणतीच लक्षणे नाहीत. त्यातही शनिवारपर्यंत पारा ४० ते ४१ अंशांदरम्यान राहण्याचा अंदाज आहे. बुधवारनंतर वातावरण काहीसे ढगाळ राहणार असले, तरी उष्णतेचा कडाका वाढल्याने पावसाच्या तुरळक सरी कोसळण्याची शक्यता आहे. दिलासा मिळणार?पावसाचा शिडकावा झाला, तर एक-दोन दिवस तापमान कमी होईल. तसे झाले तर तापमानवाढीतून काहीसा दिलासा मिळेल. मात्र, अशाप्रकारे अवेळी पाऊस झाल्याने हवेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने घामाच्या धारा लागतील, असाही अंदाज आहे.
पुढच्या आठवड्यात पाऊस?
By admin | Updated: May 8, 2017 06:14 IST