कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आवारात नगरसेवकांच्या दोन गटांमध्ये झालेल्या हामाणारीप्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी दोन्ही नगरसेवकांसह २५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी १५ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील दोन्ही नगरसेवकांना लवकरच अटक केली जाईल, असे सांगण्यात आले. शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड व भाजपा समर्थक अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांच्या समर्थकांमध्ये शनिवारी महापालिकेच्या आवारात हाणामारी झाली. त्या वेळी पोलिसांनी त्यांच्या समर्थकांवर लाठीमार करून त्यांना पिटाळून लावले. या वेळी पोलिसांनी १५ जणांना अटक केली. पोलिसांनी संबंधित नगरसेवकांसह अन्य नगरसेवकांच्या गाड्यांची तपासणी केली असता त्यातून रायफल, मिरचीपूड, हॉकी स्टीक, दांडके आढळले. पोलिसांनी नगरसेवक गायकवाड व पाटील यांच्यासह २५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींच्या वकिलांकडून न्यायालयासमोर युक्तिवाद करताना संबंधितांना अटक करण्यापूर्वी पोलिसांनी नोटीस बजावणे गरजेचे होते, असे सांगितले. (प्रतिनिधी)आरोपी लवकरच ताब्याततपास अधिकारी न्यायालयासमोर बाजू मांडताना म्हणाले की, हाणामारी करताना संबंधित आढळले. त्यामुळे त्यांच्यासह एकूण २५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. लवकरच दोन्ही नगरसेवकांसह अन्य आरोपींनाही अटक केली जाईल, असे सांगण्यात आले.
केडीएमसीतील राडा; १५ जणांना अटक
By admin | Updated: March 27, 2017 05:42 IST