पालघर : तारापूर औद्योगिक वसाहतीमधून मागील २० वर्षांपासून सोडण्यात येणाऱ्या प्रदूषित सांडपाण्यामुळे परिसरातील मच्छीमारी गावांच्या खाडीमधील मत्स्यसंपदा व जैवविविधता जवळपास संपुष्टात आली आहे. अशा वेळी एमआयडीसी, तारापूरकडून नव्याने सांडपाणी पाइपलाइन नवापूरच्या समुद्रात थेट ७.१ कि.मी. आत सोडण्यात येणार आहे. याविरोधात पर्यावरण विभागाच्या सचिवाकडे तक्रार करूनही न्याय मिळत नसल्याने अखिल भारतीय मांगेला समाज परिषदेने राष्ट्रीय हरित लवादाकडे याचिका दाखल केली आहे.तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये जवळपास दीड हजार लहानमोठे उद्योगधंदे असून कपड्यांवर रासायनिक प्रक्रिया करणारे कारखाने आहेत. या कंपन्यांमधून निघणारे रासायनिक प्रदूषित सांडपाणी प्रक्रिया करण्यासाठी एमआयडीसीच्या रासायनिक प्रक्रिया केंद्रात (सीईटीपी) पाठवण्यात येते. तेथून ते प्रक्रिया करून पामटेंभी, नवापूरमार्गे नवापूरच्या समुद्रकिनाऱ्यालगत सोडले जात असल्याचे प्रदूषण मंडळ व एमआयडीसी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. सध्या एमआयडीसीकडे २५ एमएलडी प्रक्रिया केंद्र असून ६० एमएलडी रासायनिक पाणी पूर्णपणे प्रक्रिया न करता तसेच नवापूरच्या समुद्रात सोडले जात असल्याने सर्व किनारपट्टीवरील पाण्यामध्ये प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. नवीन ६० एमएलडी प्रक्रिया केंद्राचे रासायनिक पाणी पाइपलाइनद्वारे नवापूर-आलेवाडी गावासमोरच्या समुद्रात ७.१ किमी आत सोडले जाणार असल्याने मच्छीमारांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मासे, शंख, शिंपले यांनी समृद्ध असणारा हा भाग आज रासायनिक प्रदूषित पाण्याने नष्ट होऊ पाहत आहे. मच्छिमारांमध्ये याविषयी संतापाची भावना आहे. (प्रतिनिधी)
प्रदूषित सांडपाण्याचा प्रश्न हरित लवादाकडे
By admin | Updated: May 14, 2016 00:40 IST