भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेने यंदाच्या अंदाजपत्रकात महिलांसाठी विविध योजनांतर्गत केलेली सुमारे ५ टक्के तरतूद १० टक्क्यांवर नेण्याची सूचना महाराष्ट्र विधानमंडळाच्या महिलांचे हक्क व कल्याण समितीने पालिका आयुक्त डॉ. नरेश गीते यांना केली. समितीने सोमवारी पालिका हद्दीतील महिलांच्या समस्या जाणून घेण्यासह त्यांच्या सक्षमीकरणाकरिता राबवण्यात येत असलेल्या योजनांचा आढावा घेतला. महिलांसाठी सुस्थितीतील शौचालयांची व्यवस्था तसेच पालिका शाळांतील विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेवर चर्चा केली. विद्यार्थिनींचे अपप्रवृत्तींपासून संरक्षण करण्यासाठी शाळांत जास्तीतजास्त सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची सूचना करण्यात आली. बैठकीला सर्व नगरसेवकांना आमंत्रित करण्यात आले होते. प्रभाग क्र. ५ मधील नगरसेविका कल्पना म्हात्रे यांनी भार्इंदर रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडे मोठ्या प्रमाणात वारांगनांचा वावर असल्याने त्याचा त्रास सामान्य नागरिकांंना होतो. याबाबत, पोलिसांकडे अनेकदा तक्रारी केल्या. लोकांनी स्वयंस्फूर्तीने आंदोलने केली. मात्र, त्यांच्यावर ठोस कारवाई होत नसल्याचे समितीच्या निदर्शनास आणले. समितीने विभागीय पोलीस अधिकारी नरसिंग भोसले यांच्याकडे याबाबत विचारणा केली आणि वारांगनांच्या उपद्रवावर ठोस कारवाई करण्याचे निर्देश दिले. तसेच त्यांच्या पुनर्वसनासाठी पालिका व पोलिसांनी संयुक्तपणे योजना राबवावी, अशी सूचना केली. याबाबत, आ. मंदा म्हात्रे म्हणाल्या, बैठकीतील चर्चा गोपनीय असल्याने ती उघड करणे योग्य ठरणार नाही. ज्या मुद्यावर चर्चा झाली, त्याचा अहवाल राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. सरकार आता कुठला निर्णय घेते याकडे सगळ््यांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)
महिलांसाठीची तरतूद दुप्पट करण्यात यावी
By admin | Updated: April 26, 2017 00:22 IST