बदलापूर : अनेक शहरात महत्वाकांक्षी प्रकल्पांसाठी निधी मिळत नाही अशी ओरड असते. मात्र बदलापूर पालिकेला बीएसयूपी योजनेतून कोट्यावधींचा निधी मिळालेला असतानाही त्याचा उपयोग नागरिकांना होत नाही. बीएसयूपीचे घर तयार असतानाही लाभार्थींची यादीच अंतिम होत नसल्याने त्याचे वाटप रखडलेले आहे. या अनागोंदी कारभारामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. कुळगाव बदलापूर नगरपालिका क्षेत्रातील जेएनएनयूआरएम अंतर्गत बीएसयूपीची १हजार ६३४ घरे असून म्हाडा येथे उभारण्यात आलेल्या १६ इमारतींमध्ये ३२० घरकुले बांधून तयार आहेत. सोनीवली येथे उभारलेल्या २४ इमारतीत ४८० घरकुले तयार आहेत. तर म्हाडा येथील एका इमारतीतील २० घरकुलांचे व सोनीवली येथील सात इमारतींमधील १४० घरकुलांचे काम प्रगतीपथावर आहे. त्याशिवाय सोनीवली येथील एसटीपी टँक, अंतर्गत पदपथ, मलिनस्स:रण व्यवस्था आदी कामे पूर्ण झालेली नाहीत. दुसरीकडे बायोमेट्रिक सर्वेक्षण करुन तयार केलेल्या पात्र लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची छाननी करून यादी करण्याचे काम पूर्ण झालेले नाही. लाभार्थ्यांची कागदपत्रे तपासून अंतिम पात्रता ठरविण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची एक समिती स्थापन करण्यात आली. फेब्रुवारी अखेरपर्यंत अंतिम पात्रता निश्चित करून मार्च २०१७ पर्यंत घरकुलांचे वाटप करण्याचे प्रस्तावित असल्याची माहिती चार महिन्यांपूर्वी बीएसयूपी योजनेचे काम पहाणारे अभियंता एम.एस. बसनगार यांनी दिली होती. वास्तविक बदलापूर नगरपालिका हद्दीत बीएसयूपी योजनेला २००६ मध्ये मंजुरी देण्यात आली. परंतु २००९ पर्यंत या कामासाठी साधे सर्वेक्षणही पूर्ण झाले नव्हते. प्रत्यक्ष कामाला २०१० मध्ये सुरु वात झाली. त्यामुळे सुरु होण्याआधीच चार वर्ष लांबणीवर पडलेली ही योजना लवकरात लवकर मार्गी लावून लाभार्थ्यांना घरकुलांचे वाटप होणे अपेक्षित आहे. परंतु प्रशासन सातत्याने वाटपासाठी नव्या तारखा देत आहे. (प्रतिनिधी)
घरकुल वाटप लांबणीवर
By admin | Updated: March 22, 2017 01:25 IST