संदीप प्रधान, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : उद्धवसेनेच्या उपनेत्या व राज्यसभा सदस्य प्रियंका चतुर्वेदी यांनी काँग्रेसच्या शशी थरुर यांच्या पावलावर पाऊल ठेवत पक्षाला अंधारात ठेवून विदेश दौऱ्यावर जाणाऱ्या खासदारांच्या शिष्टमंडळात आपली वर्णी लावल्याची चर्चा पक्षाच्या वर्तुळात आहे. पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्याबाबत भारताची भूमिका विदेशात मांडण्याकरिता जाणाऱ्या शिष्टमंडळात खा. अनिल देसाई यांना धाडण्याचा उद्धवसेनेचा विचार सुरू होता. परंतु, चतुर्वेदी यांनी स्वत:ची वर्णी लावल्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाइलाजाने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले, असे सूत्रांनी सांगितले.
विदेशात जाणाऱ्या शिष्टमंडळात काँग्रेसने सुचविलेल्या नावांना बाजूला सारत शशी थरुर यांना पाठविण्यात येत आहे. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी सत्ताधाऱ्यांनी निश्चित केलेल्या युसुफ पठाण यांच्या नावाला विरोध करून अभिषेक बॅनर्जी यांच्या नावाची शिफारस केली. उद्धवसेनेतर्फे प्रियंका चतुर्वेदी यांचे नाव केंद्रीय मंत्री किरण रिजीजू यांनी निश्चित केले. आपले नाव निश्चित झाल्याचे खुद्द चतुर्वेदी यांनी पक्षप्रमुखांना सांगितले. तेव्हा उद्धवसेनेकडून कोण विदेशात जाणार हे ठरविणे हा आपला अधिकार असल्याची भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली.
आपला पत्ता कट होणार असे दिसू लागताच हे चतुर्वेदी यांनी रिजीजू यांना ठाकरेंना फोन करायला लावला, असे सूत्रांनी सांगितले. मग प्रश्न उभा राहिला की, आपले खासदार विदेशात काय भूमिका मांडणार हे स्पष्ट झाल्याखेरीज त्यांना कसे पाठवायचे. मग परराष्ट्र मंत्रालयाने खासदार कोणती भूमिका मांडणार, याचा तपशील उद्धवसेनेला दिला. त्यानंतर चतुर्वेदी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.
यापूर्वीही माघार
केंद्रातील २०१४ च्या नरेंद्र मोदी सरकारमध्ये अनिल देसाई यांचा मंत्री म्हणून समावेश होण्याचे निश्चित झाले होते. मात्र, ऐनवेळी उद्धव ठाकरे यांनी विरोधी बाकावर बसण्याचा निर्णय घेतल्याने देसाई यांना शपथ न घेता माघारी परतावे लागले होते.
चतुर्वेदी यांची आता भाजपसोबत जवळीक!
चतुर्वेदी यांच्यामुळे अनिल देसाई यांची भारतीय शिष्टमंडळात समावेशाची संधी हुकली. चतुर्वेदी यांची राज्यसभा सदस्यत्वाची मुदत वर्षभरात संपुष्टात येत आहे. यापूर्वी काँग्रेसमध्ये राहिलेल्या चतुर्वेदी यांना पुन्हा राज्यसभेवर पाठविण्याइतपत संख्याबळ उद्धवसेनेकडे नाही. त्यामुळे त्या भाजपसोबत जवळीक वाढवत असल्याचे उद्धवसेनेत बोलले जाते.
पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली. त्यानंतर धोरण म्हणून विदेशात खासदारांची शिष्टमंडळे पाठविण्याचे ठरवताना त्या-त्या पक्षाला किंवा त्यांच्या गटनेत्यांना विश्वासात घेणे गरजेचे होते. शशी थरूर, प्रियंका चतुर्वेदी आदी नावे केंद्र सरकारने निश्चित करून पाठवली. त्यामुळे राजकीय पक्षांना निर्णय घेण्याची संधी मिळाली नाही. - अरविंद सावंत, गटनेते उद्धवसेना, लोकसभा.
संसदीय कामकाज मंत्रालयाने अगोदर खासदारांची नावे निश्चित करून त्यांना फोन केले. तसाच मलाही फोन आला. मला वाटले माझ्या पक्ष नेत्यांची अनुमती घेऊन मग मला कळविले असावे. संसदीय कामकाज मंत्रालयाने प्रोटोकॉलचे पालन करायला हवे होते. संवादाच्या अभावातून हे घडले. - प्रियंका चतुर्वेदी, खासदार उद्धवसेना.