ठाणे : ‘सत्यम’ लॉजप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.जी. गावित यांची पुन्हा नियंत्रण कक्षातून मूळ वर्तकनगर पोलीस ठाण्यात नियुक्ती केली आहे. आगामी ठाणे महापालिका निवडणूक तसेच प्रशासकीय कारणास्तव ही बदली केल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली.वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील उपवन भागातील ‘सत्यम’ लॉजवर ठाणे महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने डिसेंबर २०१६ मध्ये कारवाई केली होती. या वेळी तिथे २९० खोल्यांवर कारवाई केल्याचा दावा महापालिकेने केला होता. तसेच त्या ठिकाणी कुंटणखाना चालवला जात असल्याचेही उघड झाले होते. प्रत्यक्षात त्या ठिकाणी ५५ खोल्या असल्याचा पंचनामा वर्तकनगर पोलिसांनी केला होता. यातूनच पालिका अधिकारी आणि वर्तकनगर पोलीस यांच्यात चांगलीच जुंपली होती. प्रकरण चिघळल्यानंतर गावित यांनी आयुक्त संजीव जयस्वाल यांची माफीही मागितली होती. परंतु, या प्रकरणात त्यांची पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी तडकाफडकी ठाणे नियंत्रण कक्षात बदली केली होती. दरम्यान, ‘सत्यम’च्या चौकशीच्या अधीन राहून ही बदली केल्याचे सांगण्यात आले. आता निवडणूक तसेच प्रशासकीय कारणास्तव गावित यांना पुन्हा वर्तकनगर येथे आणले आहे. (प्रतिनिधी)
पोलीस निरीक्षक के.जी. गावित यांना क्लीन चिट
By admin | Updated: February 11, 2017 03:57 IST