ठाणे : अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाईचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतर ठाणे महापालिकेने शहरातील धार्मिक स्थळांची वर्गवारी करून जी कायद्याच्या चौकटीत बसून नियमित करता येऊ शकतात, अशी तब्बल ५२८ धार्मिक स्थळे नियमित करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. परंतु, उर्वरित १२४ धार्मिक स्थळांवर कारवाईसंदर्भात सहा महिने उलटूनही अद्याप कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही. याउलट, या धार्मिक स्थळांबाबत संबंधितांना नोटिसा पाठवल्याचा दावा केला आहे. परंतु, यातील किती हलवण्यात आली आणि किती शिल्लक आहेत, याची यादी मात्र पालिकेकडे उपलब्ध नाही.सार्वजनिक जागेवरील धार्मिक स्थळे नियमाकूल करणे, निष्कासित करणे आणि स्थलांतरित करणे, याबाबतची बैठक आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली गेल्या वर्षी जानेवारीत पार पडली होती. या बैठकीमध्ये ज्या धार्मिक स्थळांबाबत आक्षेप प्राप्त झाले होते, त्याची सुनावणी घेऊन संबंधित धार्मिक स्थळांची पुनर्पाहणी करण्याचे आदेश संबंधितांना दिले होते. त्यानुसार, संबंधित विभागाने त्यांची वर्गवारी केली. त्यानुसार, अ वर्गामध्ये ज्या एकूण ५८७ धार्मिक स्थळांचा समावेश आहे, त्याबाबत संबंधित परिमंडळाचे उपायुक्त, सहायक आयुक्त आणि शहर विकास विभागाचे अधिकारी यांनी संबंधित धर्मस्थळे डीसीआरप्रमाणे नियमाकूल होतील अथवा नाही, याबाबत एका महिन्यात स्पष्ट अहवाल देण्याच्या सूचना त्या बैठकीत दिल्या होत्या. त्यानुसार, आता शहरातील ५२८ धार्मिक स्थळे कायद्याच्या चौकटीत बसवून नियमित करता येऊ शकतात, असा अहवाल संबंधित विभागाने शहर विकास विभागाला दिला होता. या सर्व्हेनंतर शहरातील १२४ धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याचे पालिकेने निश्चित केले होते. त्यानुसार, ही कारवाई करताना अनुचित प्रकारदेखील घडू शकतात, अशी शक्यता असल्याने संबंधित विभागाने स्थानिक पोलीस ठाणे आणि त्या धार्मिक स्थळाच्या विश्वस्तांना नोटिसा देऊन कारवाईच्या वेळेस कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, असे बजावले होते. (प्रतिनिधी)
‘त्या’ धार्मिक स्थळांची पालिकेस माहितीच नाही
By admin | Updated: April 25, 2017 00:06 IST