बोर्डी : डहाणू समुद्रकिनारी पर्यावरण संवर्धनाकरीता ताडगोळे रोपणाचा उपक्रम लोक चळवळीत रूपांतरीत झाला आहे. या उपक्रमाचा प्रणेता कुंदन मधूकर राऊत यास ताडगोळे रोपण करीत असताना पकडून रेतीचोर ठरविण्याचा प्रताप शुक्रवार २५ सप्टेंबर रोजी डहाणू पोलीसांकडून घडला. या प्रकाराने समाजाच्या सर्वच स्तरातून संताप व्यक्त होत आहे. रेतीचोरी रोखण्यात अपयशी ठरलेल्या डहाणतील प्रशासनाविरूद्ध जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याचा पवित्रा नागरीकांनी घेतला आहे.डहाणू तालुक्यातील ३५ कि. मी. लांबीचा समुद्रकिनारा निसर्गसौदर्य आणि जैवविविधतेने नटला आहे. वाढते शहरीकरण, सेकंड होमची मानसिकता इ. मुळे बिल्डर लॉबी सक्रीय होऊन अवैध रेती उत्खननाद्वारे मोठ्या प्रमाणावर रेतीचोरी केली जाते. त्याचा फटका किनाऱ्यालगत सुरू बाग, शेती व घरांना बसत आहे. हा धोका लक्षात घेऊन नरपड गावातील कुंदन मधूकर राऊत (४५) यांनी किनाऱ्यावर ताडबीया रोपण करण्यास सात वर्षांपूर्वी केला. चिखले समन्वय ग्रुपने घोलवड पोलीस, बोर्डी वनपरिक्षेत्र, स्थानिक मंडळे, संस्था यांना संघटीत करून प्रतिवर्षी आॅगस्ट महिन्यात सामुहिक ताडबिया रोपणाचा वृक्षारोपण कार्यक्रम राबविला जातो. लोकमतने याची दखल घेतल्यानंतर उपक्रमाचे लोक चळवळीत रूपांतर झाले. आजतागायत अंदाजे १३ ते १४ हजार ताडांची रोपे डौलाने किनाऱ्यावर दिसतात. शुक्रवारी बकरी ईदच्या दिवशी सकाळी साडेनऊच्या सुमारास कुंदन राऊत ताडबियांचे रोपण करीत असताना डहाणू पोलीसांनी त्यांना रेतीचोर ठरवून पारनाका येथील चौकीत नेले. या वृत्ताने पर्यावरण प्रेमींमध्ये संताप पसरला. सचिन राऊत, ललित राऊत, देवेंद्र राऊत यांसह अन्य नागरीकांनी कुंदनच्या सामाजिक उपक्रमाची माहिती पोलीसांना दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीसांनी सावरासावर करीत कुंदन यांना सोडून दिले. मात्र चोर सोडून सन्याशाला फाशी देण्याच्या प्रकाराने स्थानिक पर्यावरणप्रेमी दुखावला आहे. या प्रकाराचा निषेध नोंदवून डहाणूतील ढिसाळ प्रशासनामुळे पर्यावरणाची दुरावस्था जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनवजा तक्रारीतून देण्याचा पवित्रा पर्यावरणप्रेमींनी घेतला आहे.
पर्यावरणरक्षकावर पोलिसांची कारवाई
By admin | Updated: September 26, 2015 00:38 IST