कल्याण: भाजप पक्षाच्या फेसबुक पेजवर केडीएमसीचे आयुक्त ई रविंद्रन यांचा फोटो टाकण्यात आल्याने नवा वाद उभा राहीला आहे. याप्रकरणी दस्तुरखुद्द आयुक्तांनी भाजपाचे कल्याण जिल्हाध्यक्ष तथा आमदार नरेंद्र पवार यांना नोटीस बजावली असून याप्रकरणी तीन दिवसात स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे. केडीएमसी सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने महापालिका परिक्षेत्रात सद्यस्थितीला आचारसंहिता लागू असून आयुक्त रविंद्रन हे निवडणुक अधिकारी आहेत. दरम्यान भाजपाच्या फेसबुकवर आयुक्तांचा फोटो झळकल्याने एकप्रकारे आचारसंहिता भंगाचा प्रकार संबंधित पक्षाकडून घडला आहे. ही बाब आयुक्त रविंद्रन यांच्या निदर्शनास येताच याबाबत त्यांनी स्वत: निवडणुक प्रक्रियेचे प्रमुख म्हणून पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार पवार यांना नोटीस बजावली आहे. फोटो कसा काय टाकला? अशी विचारणा करण्यात आली असून याबाबत खुलासा करण्यास सांगण्यात आले आहे. यासंदर्भात पवार यांच्याशी लोकमतने संपर्क साधला असता फोटो कसा काय वापरला गेला याबाबत माहीती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भाजपच्या फेसबुकवर आयुक्तांचा फोटो
By admin | Updated: October 19, 2015 01:10 IST