ठाणे : ठाणे महापालिकेच्या माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या साहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी एमएमआर रिजनमधील सर्व महापालिका आणि नगरपालिकांमधील अधिकारी व कर्मचारी वर्ग यांनी एक दिवस काम बंद आंंदोलन केले. ठाण्यातील लोकप्रतिनिधींनी देखील या आंदोलनाला पाठिंबा देऊन बुधवारची महासभा पूर्णवेळ तहकूब केली.
मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत महाराष्ट्र राज्य मुख्य अधिकारी संघटनेच्या वतीने हा निर्णय जाहीर केला होता. त्यानुसार बुधवारी एमएमआर रिजनमधील महापालिका आणि नगरपालिकांमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या ४० हजारांच्या घरात असून यामुळे कामावर मोठा परिणाम झाल्याचे दिसून आले. या प्रकारामुळे मोठ्या प्रमाणात मानसिक खच्चीकरण झाले असल्याची भावना या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळेच हे काम बंद आंदोलन केल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, बुधवारी झालेल्या महासभेत भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी या संदर्भात सभा तहकुबी मांडली होती. साहाय्यक आयुक्तांवर झालेला हा हल्ला प्राणघातकी होता, त्यामुळे अशा घटना पुन्हा घडू नयेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त करून महासभा तहकूब करण्याची मागणी केली. त्याला शिवसेनेचे गटनेते दिलीप बारटक्के यांनी अनुमोदन दिले. तर, महापौर नरेश म्हस्के यांनी या घटनेचा निषेध करून बुधवारी एमएमआर रिझनमध्ये सर्वांनीच काम बंद आंदोलन केले असल्याचे सांगितले. त्यानुसार ठाणे महापालिकेतील अधिकाऱ्यांनी देखील काम बंद ठेवले आहे. तसेच त्यांच्या संघटनेने देखील निवेदन दिले असल्याचे सांगितले. त्यामुळे सभागृहात चर्चा करण्याऐवजी त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून महासभा पूर्णवेळ तहकूब करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले.