ठाणे : २२ मार्च २०२० रोजी जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला. भीतीने या दिवसाची सुरुवात झाली होती. एक दिवसच घरात बसावे लागेल असे नागरिकांना वाटत होते. परंतु ही समजूत चुकीची होती, हे नंतर लक्षात आले. त्या दिवशी भयाण शांतता, फक्त पक्ष्यांचे आवाज ऐकू येत होते. आज या दिवसाला एक वर्ष पूर्ण होत आहे, त्याबद्दल ठाण्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी आपले अनुभव कथन केले.
-------------------------------------------------
कधी कल्पना केली नव्हती असा दिवस गेल्या वर्षी २२ मार्च रोजी अनुभवला. फेब्रुवारी २०२० च्या अखेरीस एक नवा संसर्गजन्य रोग आला आहे आणि दुबई, युरोपमध्ये त्याचे रोगी आढळले आहेत हे कळलं होतं. पण भारतावर हे संकट येईल, असे वाटले नव्हते. याआधी सार्स, बर्ड फ्लू आले, पण भारतावर फार परिणाम झाला नव्हता. त्यामुळे या कोविड १९ चा ही होणार नाही असा समज होता. हा समज किती चुकीचा होता, हे पुढच्या काही महिन्यांत समजलं. २२ मार्च २०२० रोजीचा जनता कर्फ्यू मागे लागला तो अगदी २०२० साल संपेपर्यंत. बरे-वाईट (वाईटच जास्त) अनुभव सगळ्यांनाच आले. आज वर्षानंतरही जगाचे व्यवहार सुरळीत चालू झालेले नाहीत. कधी होतील- कसे होतील माहिती नाहीत. भविष्य फार आशादायी नाही. मात्र तरीही लोकांची जगण्याची उमेद खचलेली नाही.
- मकरंद जोशी, पर्यटन व्यावसायिक
---------------------------------------------------
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना महामारीमुळे जनता कर्फ्यू पुकारल्याचे जाहीर केले, तेव्हा हा कर्फ्यू एका दिवसाचा आहे की अजून काही दिवस गंभीर परिस्थिती निर्माण होणार या भीतीने दिवसाची सुरुवात झाली. पण दुपारपर्यंत दूरदर्शनवर विविध बातम्या बघितल्या व हा काहीतरी भयंकर आजार आहे, याची कल्पना आली. दुपारनंतर लक्षात आले की, आपण एका मोठ्या महामारीला सामोरे जात आहोत. जशी १९२० साली प्लेगची साथ आली होती तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे, याची कल्पना झाली.
- प्रा. एकनाथ पवळे, अध्यक्ष, निसर्ग क्रीडा संवाद, ठाणे.
----------------------------------------------------------
२२ मार्च २०२० ही तारीख कोणताही भारतीय नागरिक कधीही विसरू शकणार नाही. पंतप्रधानांनी केलेल्या जनता कर्फ्यूच्या आवाहनाने नागरिक काहीसे भांबावले होते व घाबरलेही होते. त्यादिवशी केवळ रस्त्यांवरच नव्हे तर मनामनात भयाण शांतता होती. कोरोनाचा विळखा आपल्याभोवती घट्ट होत चालला आहे याची जणू त्यादिवशी नांदीच होत होती. एरवी उत्साहाने ओतप्रोत भरलेला आमचा ब्रम्हांड कट्टा त्यादिवशी काहीसा निरस झाला होता. कारण २१ मार्च हा आमचा वर्धापन दिन सोहळा रद्द करावा लागला होता व ऑनलाइन तंत्र फारसे प्रचलित नव्हते. आज वर्षानंतर कोरोनाच्या या समस्येने परत तोंड वर काढले आहे. मनात भीती तर आहेच परंतु आज ऑनलाइन माध्यमातून आम्ही उत्साहाने आमचा वर्धापन दिन साजरा करणार आहोत. कोरोनाचे हे संकट लवकरात लवकर टळू दे.
- राजेश जाधव, संस्थापक, ब्रह्मांड कट्टा परिवार
-----------------------------------------------
आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नका, असे शब्द कधी ऐकावे लागतील असा विचारदेखील कोणी केला नव्हता. हा जनता कर्फ्यू देशभर लागू करण्यात येणार आहे. जनतेनी सरकारी कर्मचाऱ्यांविषयी आदराची भावना ठेऊन यात सहभाग घ्यावा, असे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री म्हणाले. जनता कर्फ्यूबद्दल अनेक जण ट्वीट करत होते. व्हाॅट्स ॲप युनिव्हर्सिटीमधून मार्गदर्शन होत होते. २२ मार्च २०२० हा आमच्या आयुष्यातील अभूतपूर्व दिवस होता. संकटावर मात कशी करायची या चिंतेने सर्व जग ग्रासले असताना आम्हाला दोन्ही बाजूनी संकटानी घेरले होते. पण काही माणसांनी दाखवलेल्या माणुसकीने, मित्र-मैत्रिणींनी पुढे केलेल्या मदतीच्या हाताने या संकटातून तारले. पण आजच्या दिवशी एक वर्षानेदेखील काटा उभा राहतो अंगावर, हे सर्व आठवून.
- संध्या सावंत, संस्थापिका, मातृसेवा फाउंडेशन
-------------------------------------
२२ मार्च २०२० रोजी मी दुपारी १ वाजता गोडबोले हॉस्पिटलजवळून जेवणाचा डबा आणायला गेलो होतो. त्या जेवण देणाऱ्या ताई म्हणाल्या, काही बँकेच्या अधिकाऱ्यांनाही जेवणाचे डबे देत आहे. घरापासून लांब नोकरी करणाऱ्यांचे कसे होईल? आता? जे सामान भरले आहे ते संपेपर्यंत जेवणाचे डबे देऊ शकेन. आता? रस्त्यावर चिटपाखरूही नाही. कसे होणार? मी नौपाडा पोलीस स्टेशनवरून पुढे आलो, जागेजागेवर पोलीसच दिसत होते. बाईकला अडकवलेली पिशवी पाहून त्या पोलिसांने माझ्याकडे पाहून न पाहिल्यासारखे केले. घरी आल्यावर विचार आला की आपल्याला तर जेवण मिळेल ,पण हजारो लोक दुपारी वडापाव, मिसळपाव खाऊन राहतात त्यांचे काय होईल? कुठे जातील ते? बाहेर पडायला त्यांच्याकडे ना आयकार्ड ना कसला पुरावा? जनता कर्फ्युमध्ये सर्वात भरडला जाणार तो हाच वर्ग ! त्या भयाण शांततेने एक उदासी दिली.
- प्रा. संतोष राणे, प्रकाशक
-------------------------------------------------
एक दिवस होईल लाॅकडाऊन असा विचार करून सुरू झालेला हा प्रवास पूर्ण वर्षभर चालला. खूप कठीण काळ होता सगळ्यांसाठी. परंतु यातून पण आपल्याला खूप शिकायला मिळाले. आपण सगळे एकत्र आलो. सगळ्यांनी मिळून या कठीण परिस्थितीत अनेक मार्ग काढले. मुलांनी वर्षभर ऑनलाइन शिक्षण घेतले. आपण थांबलो नाही, पुढे सरकत राहिलो. अजूनही कोविड आपल्या आजूबाजूला असला तरी आपण सर्वजण यामधून सुखरूप बाहेर पडू.
- मानसी प्रधान, सहसचिव, ज्ञानसाधना महाविद्यालय