बदलापूर : मध्य रेल्वेच्या बदलापूर रेल्वे स्थानकात मध्यभागी असलेला पादचारी पूल हा देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी ९ आॅगस्ट ते ३ सप्टेंबरपर्यंत बंद राहणार आहे. त्यामुळे पर्यायी पूल हा अरुंद असल्याने या ठिकाणी प्रवाशांना मोठी कसरत करावी लागणार आहे. आधीच बदलापूर स्थानकात पोहोचण्यासाठी एकच मार्ग असल्याने प्रवाशांना आवरण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाला उपाययोजना आखावी लागणार आहे.अंधेरी येथे झालेल्या दुर्घटनेनंतर मध्य रेल्वेने अनेक पुलांच्या देखभाल आणि दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. याची सुरुवात ही बदलापूरपासूनच करण्यात आली आहे.यापूर्वीच बदलापूर रेल्वे पुलाच्या जिन्यांच्या दुरुस्तीचे काम करण्यास मध्य रेल्वे प्रशासनाने सुरुवात केली होती. मात्र, रेल्वे रुळांवर मध्यभागी असलेल्या पुलाचे काम करण्यास प्रवाशांची वर्दळ असल्याने अनेक अडचणी होत्या. अखेर, रेल्वेच्या तांत्रिक विभागाने मान्यता दिल्यानंतर पुलाचे काम ९ आॅगस्टपासून हाती घेण्यात येणार आहे.
प्रवाशांना करावी लागणार कसरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 02:03 IST