वाडा : राज्य कृषी भूषण पुरस्कार प्राप्त असलेले वाडा तालुक्यातील (रा. सांगे) येथील प्रयोगशील शेतकरी अनिल पाटील यांनी आपल्या शेतावर अत्यंत कमी खर्चीक व अधिक उत्पन्न देणारी प्लॅस्टीक मल्चींग तंत्राची भातशेतीची पद्धत विकसीत केली आहे. या प्रयोगाची पाहणी राज्याचे कृषी आयुक्त विलास देशमुख यांनी नुकतीच करून अनिल पाटील यांचे कौतुक केले.उखळणी चिखलणीची गरज नसलेली व अत्यंत सोपी कमी खर्चाची व अधिक उत्पन्न देणारी प्लॅस्टीक मल्चींग ही भातशेती मधील आधुनिक पद्धत शेतकऱ्यांना वरदान ठरेल अशी प्रतिक्रीया कृषी आयुक्त विकास देशमुख यांनी या शेतीची पाहणी केल्यानंतर व्यक्त केली.गेल्या चार वर्षापासून अनिल पाटील हे या पद्धतीने भातशेती करीत असून त्यांनी कमी खर्चात अधिक उत्पन्न घेतले आहे. भाताच्या रोपा व्यतिरीक्त उर्वरीत भागावर प्लास्टीकचे आवरण असल्याने शेतात गवत उगवत नाही. अति पावसामुळे सेंद्रीय पदार्थांचे नुकसान होत नाही. गाळ वाहून जात नाही. तसेच याच जमिनीत रब्बी हंगामात हरभऱ्याचे अधिक उत्पन्न देणारे पीक घेता येते. या नवीन प्रयोगाची पाहणी कृषी आयुक्त विकास देशमुख यांनी करून अनिल पाटील यांचे कौतुक केले.यावेळी कृषी विभागाचे सहसंचालक महावीर जंगटे, पालघर जिल्हा कृषी अधिक्षक डॉ. प्रकाश पवार, आत्मा प्रकल्प संचालक आर. जी. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
प्लॅस्टिक मल्चीन पद्धतीने वाड्यात भातशेती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2015 22:22 IST