ठाणे : ठाणे महापालिकेच्या वतीने निवडणुकीबाबत कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणवर्गास दांडी मारणाऱ्या दोनशेपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत. ठाणे महापालिकेने निवडणुकीच्या कामासाठी १२ हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. ही तयारी आता अंतिम टप्प्यात आली असून ठाण्यातील गडकरी रंगायतन, डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, अशोक टॉकीज आणि मल्हार सिनेमा अशा चार ठिकाणी अलीकडेच प्रशिक्षण वर्गांचे आयोजन केले होते. या वेळी काही तांत्रिक अडचणीदेखील आल्या होत्या. त्यामुळे प्रशिक्षणवर्ग उशिरा सुरू झाले होते. काही केंद्रांवर प्रोजेक्टरदेखील लावण्यात आले नव्हते. शनिवारीदेखील अशा प्रकारच्या प्रशिक्षणवर्गाचे आयोजन सकाळी आणि दुपारी अशा दोन सत्रांमध्ये केले होते. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी मतदान केंद्राध्यक्ष, कक्षाधिकारी १, २, ३ आदी कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. सर्व कर्मचाऱ्यांना मतदानासाठी येणाऱ्या नागरिकांना कशा पद्धतीने मार्गदर्शन करावे, प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीची परिस्थिती कशी हाताळावी, यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी सर्व प्रशिक्षकांना एव्हीएम मशीन प्रत्यक्ष हाताळण्यास देण्यात आल्या होत्या. मात्र, या प्रशिक्षणवर्गाला दोन्ही सत्रांमध्ये मिळून दोनशेपेक्षा अधिक कर्मचारी गैरहजर राहिल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता त्यांच्यावर निवडणूक नियमानुसार कारवाई केली जाणार आहे. प्रशिक्षण कार्यक्र मात अतिरिक्त आयुक्त अशोककुमार रणखांब, निवडणूक निर्णय अधिकारी अमोल यादव, उपायुक्त संदीप माळवी, उपायुक्त संजय निपाणे, माहिती व जनसंपर्कअधिकारी महेश राजदेरकर, सहायक आयुक्त संजय शिंदे, कार्यकारी अभियंता गोळे, अहिरे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
गैरहजर २०० कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश
By admin | Updated: February 12, 2017 03:36 IST