अंबरनाथ : अंबरनाथ पालिकेने अर्थसंकल्पाआधीच्या सर्वसाधारण सभेत घनकचरा व्यवस्थापन कराचा विषय मंजुरीसाठी सभागृहात मांडला होता. मात्र विषय वाचल्यावर लागलीच कोणतीही चर्चा न करताच तो विषय रद्द करण्याची मागणी नगरसेवकांनी केली. गेल्याच वर्षी करवाढ केलेली असतांना पुन्हा नवी करवाढ नको, अशी भूमिका सर्व पक्षाच्या नगरसेवकांनी घेतली.अंबरनाथ पालिकेने घनकचरा व्यवस्थापनांतर्गत शहरात नव्या घंटागाड्या सुरु केल्या आहो. त्याच्या खर्चाचा ताण पालिकेच्या तिजोरीवर पडत आहे. घनकचरा व्यवस्थापनाचे काम सुरू झाल्यावर शासनाच्या नियमाप्रमाणे नागरिकांवर घनकचरा व्यवस्थापन शुल्क आकारावे, असे स्पष्ट निर्देश आहेत. त्यानुसार पालिकेच्या सर्वसाधारण सभेत घनकचरा व्यवस्थापन शुल्क आकारण्याचा विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आला. तो चर्चेला आलेला असला, तरी प्रशासनाचे न ऐकता थेट हे शुल्क आकारू नये, अशी ठाम भूमिका शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसे आणि अपक्ष नगरसेवकांनी घेतली. हा विषय स्थगित ठेवण्याची मागणी मुख्याधिकाऱ्यांनी केली. तरीही हा विषय रद्दच करा, असा हट्ट नगरसेवकांनी धरल्याने नगराध्यक्षा प्रज्ञा बनसोडे यांनीही तो रद्द केला. त्यामुळे तूर्त घनकचरा व्यवस्थापन शुल्कातून अंबरनाथकरांची सुटका झाली आहे. (प्रतिनिधी)
घनकचरा व्यवस्थापन कराला विरोध
By admin | Updated: February 23, 2017 05:46 IST