ठाणे : नवी मुंबईकडे जाणाऱ्या विटावा पुलाखालील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्याने आठवडाभर बंद असलेला हा रस्ता मंगळवारी सायंकाळपासून वाहतुकीसाठी खुला होणार असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. अत्याधुनिक एम-६० हायग्रेड मॉडीफाय सिमेंट काँक्रिटने दुरुस्ती केल्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात येथे खड्डे पडणार नसल्याचा दावा पालिकेने केला असून त्यासाठी ६० लाख खर्च झाला आहे.
रस्त्याखाली पाण्याचे झरे असल्याने दुरुस्तीनंतर तो दरवर्षी उखडला जातो. यापूर्वी पालिकेने येथील दुरुस्तीसाठी काँक्रिटीकरणाचा, त्यानंतर पेव्हरब्लॉक तसेच स्टील सिमेंट काँक्रिटचा उतारासुद्धा शोधला होता. परंतु, हे तीनही प्रयोग सपशेल फसले आहेत. दरवर्षी लाखोंची उधळपट्टी होऊनही यावर योग्य असा तोडगा काही अद्यापही पालिकेला सापडू शकलेला नाही. त्यातही पुलाची उंची ही ४.२ मीटर एवढी असून रुंदी सात मीटर एवढी आहे. त्यामुळे दुरुस्ती करताना सिमेंटचा जास्तीचा लेअर याठिकाणी टाकता येत नसल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. जास्तीचा लेअर टाकला तर पुलाची उंची कमी असल्याने वाहनांच्या आवकजावकवर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळेच दुरुस्ती करताना केवळ तीन इंचाचाच मुलामा त्यावर देता येणे शक्य होत आहे.
दुसरीकडे रस्त्याखाली झरे असल्याने कितीही दुरुस्ती केली, तरी या झऱ्यांमुळे पुन्हा हा रस्ता खराब होत आहे. त्यामुळे यावर उपाय म्हणून यंदा ६० लाख खर्च करून पालिकेने अत्याधुनिक स्वरूपाचे असलेल्या एम-६० हायग्रेड मॉडीफाय सिमेंट काँक्रिटने दुरुस्ती केली आहे. एखाद्या ठिकाणी सिमेंट काँक्रिट टाकल्यानंतर त्यावरून वाहन जाण्यासाठी किमान १४ दिवसांचा कालावधी आवश्यक असतो, असे पालिकेचे म्हणणे आहे. परंतु, याठिकाणी तत्काळ वाहतूक सुरू होत असल्याने आता हे नवीन तंत्रज्ञानही किती फायदेशीर ठरणार, हे काही दिवसांतच स्पष्ट होणार आहे. असे असले तरी आता या रस्त्याची दुरुस्ती पूर्ण झाली असून मंगळवारी सायंकाळी ६ नंतर हा रस्ता वाहतुकीसाठी खुला होणार असल्याचे पालिकेचे नगरअभियंता रवींद्र खडताळे यांनी स्पष्ट केले.