तलवाडा : विक्रमगड तालुक्यातील वीजेची समस्या सोडविण्यासाठी तालुका निर्मीतीनुसार २६ जानेवारी २००९ रोजी महावितरण उप विभागीय कार्यालय (उप कार्यकारी अभियंता) सुरु करण्यांत आले़ परंतु त्यासाठी देण्यात आलेला कर्मचारी वर्ग हा खूपच अपुरा असल्याने व या कार्यालयामध्ये तालुकानिर्मीतीपासूनच सुविधांच्या अभावामुळे येथील कर्मचाऱ्यांवर मोठा ताण पडतो आहे. विक्रमगड शहरातील २५ हजार व तालुक्यातील वीज ग्राहकांसाठी अवघे ०८ कर्मचारी असल्याने वीज समस्या कायम आहेच़ त्यामुळे येथील उपविभागीय कार्यालय हे नुसते नावापुरते असल्याचा आरोप वीज ग्राहक करीत आहेत़ विक्रमगड शहरातील ओंदे वीजकेंद्रातून साखरा, विक्रमगड व आलोंडा असे तीन ट्रान्सफॉर्मर व त्याअंतर्गत गाव खेडयापाड्यांना वीज पुरविली जाते़ त्यामध्ये एल टी लाईन १३०० कि़ मी च्यावर, एस टी लाईन ३८० कि़ मी़ व ३३ के़ व्ही ४० कि़ मी असल्याने व विक्रमगड हा दुर्गम आणि जंगल भाग असल्याने पावसाळयात या लाईनमध्ये अथवा ट्रान्सफॉर्मरमध्ये काही बिघाड झाल्यास वीज खंडीत होण्याचे प्रकार घडत असतात़ परंतु कर्मचारी कमी असल्याने त्याचे निराकरण होण्यास प्रचंड विलंब लागतो. दरम्यानच्या काळात या परिसराची वाढलेली लोकसंख्या व त्या अनुषंगाने वाढलेल्या तक्रारी यांचे निराकरण करण्यासाठी कर्मचारी वाढवावेत अशी मागणी जनता करीत आहे. विक्रमगड तालुक्यासोबत उप सहायक अभियंता कार्यालय सुरू झाले. त्यानंतर तालुक्यातील ग्राहक प्रचंड प्रमाणात वाढले पण कर्मचारी वाढले नाहीत. त्यामुळेच सेवेचा दर्जा घसरला. तो सावरण्यासाठी उर्जामंत्र्यांकडे नव्याने तीन सेक्शन सहायक अभियंता कार्यालय सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव ऊर्जामंत्र्यांकडे करण्यात आले आहे. - महेश आळशी, भाजपा जिल्हा जेष्ठ पदाधिकारी विक्रमगड
तालुक्यासाठी अवघे ८ कर्मचारी
By admin | Updated: March 2, 2016 01:34 IST