ठाणे - नोकरदारांना नव्या वर्षात जवळपास सर्वच सुट्यांचा पुरेपूर आनंद घेता येणार आहे. कारण २०१५ साली आलेल्या २५ सुट्यांपैकी एकच सुटी रविवारी आल्याने बुडाली आहे, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी ही माहिती दिली. ५ सुट्या शनिवार व रविवारला जोडून येणार आहेत. दोन सुट्या सोमवारी येणार आहेत. बाहेरगावी जाणाऱ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे. १७ जून ते १६ जुलै २०१५ आषाढ अधिकमास आहे. त्यामुळे नागपंचमी, श्री गणेश चतुर्थी, दसरा, दिवाळी हे सण सुमारे वीस दिवस उशिरा येत आहेत. तसेच अधिक आषाढ महिना आल्याने कोकिळा व्रत आले आहे. सन २०१५ मध्ये मकर संक्रात १५ जानेवारीला आहे. या नूतन वर्षी १४ जुलै २०१५ ते ११ आॅगस्ट २०१६ या काळात गुरू सिंह राशीत येणार असल्याने नाशिक त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा भरणार आहे. हा योग दर १२ वर्षांनी येतो. त्यामुळे हजारो साधू, हटयोगी गोदावरी स्नानासाठी नाशिकच्या त्र्यंबकेश्वरला येणार आहेत. सिंहस्थ असल्याने पुढील वर्षभर विवाह मुहूर्त नाहीत, अशी अफवा पसरली आहे. त्यात काहीही तथ्य नसल्याचे सोमण स्पष्ट केले. सिंह नवमास काळात विवाह मुहुर्त नसतात. हा काळ नेमका चार्तुमासत येणार असल्याने जुलै, आॅगस्ट, सप्टेंबर, आॅक्टोबरचे चार महिने वगळता सर्व आठ महिन्यांत विवाह मुहुर्त आहेत. (प्रतिनिधी)‘गीता रहस्या’ची शतकपूर्ती> सन २०१५ मध्ये जून महिन्यात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या गीतारहस्य ग्रंथाला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. गीता ग्रंथाचे उद्दीष्ट मोक्ष व संन्यास नसून निष्काम कर्मयोग हेच असल्याचे, लोकमान्य टिळकांनी पटवून दिले आहे. फळ मिळणारच असते परंतु त्याची आसक्ती नसावी हे स्पष्ट केले आहे. आसक्ती हेच दु:खाचे मूळ असते, असे प्रतिपादन लोकमान्यांनी गीता रहस्य ग्रंथात केले आहे.एकूण चार ग्रहणे> सन २०१५ मध्ये एकूण चार ग्रहणे आहेत त्यापैकी दोन सूर्यग्रहणे भारतातून दिसणार नाहीत. ४ एप्रिलचे खंडग्रास चंद्रग्रहण आपल्या इथून दिसेल. २८ सप्टेंबरचे चंद्रग्रहण गुजरात-राजस्थानच्या काही भागांतून दिसेल. गुरुपुष्यामृत> सुवर्ण खरेदी करण्यासाठी १६ जुलै व १३ आॅगस्ट असे दोन गुरूपुष्ययोग येत आहेत. गणेश भक्तांसाठी १ सप्टेंबर रोजी अंगारकी संकष्टी येत आहे.
नव्या वर्षात २५ सुट्यांपैकी एकच रविवारी
By admin | Updated: December 31, 2014 10:03 IST