ठाणे : नव्याने बांधण्यात येणाऱ्या इमारतीच्या बांधकामाचे साहित्य ने-आण करणारी लिफ्टर कोसळल्याची घटना शनिवारी सकाळी ९ वाजता ठाण्यातील वृंदावन सोसायटी परिसरात घडली. या घटनेत यासीन शेख (२७) तरुण जखमी झाला आहे. यामध्ये बाजूच्या सोसायटीच्या संरक्षण भिंतीचे नुकसान झाले आहे.
लिफ्टर व्यवस्थित बांधली नसल्याने कोसळली असल्याचा प्राथमिक अंदाज ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे. या इमारतीचे तळ अधिक सात मजल्यांचे बांधकाम सुरू आहे. त्यासाठी लागणाऱ्या बांधकाम साहित्याची ने-आण करण्यासाठी ही लिफ्टर उभारली होती. ती अचानक सकाळी कोसळल्याने मोठा आवाज झाला. याबाबत माहिती मिळताच ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तर जखमी झालेल्या यासिन यांच्या उजव्या पायाला दुखापत असून त्याला उपचारार्थ रुग्णालयात दाखल केल्याची माहिती कक्षाच्या अधिकाऱ्यांनी दिली.