उल्हासनगर : महापालिका मतदानाच्या आदल्यादिवशी सोमवारी दुपारी ३ वाजता ओमी कलानी व भाजपाचे उमेदवार दिनेश रॉय यांच्यावर अनोळखी व्यक्तींनी चाकू हल्ला केल्याची घटना घडली आहे. हल्ल्यानंतर हल्लोखर पळून गेले. दरम्यान, पोलीस अधिक चौकशी करत असून, गुन्हा दाखल केलेला नाही.शहरातील प्रभाग क्रमांक सात अतिसंवेदनशील आहे. रिपाइंचे शहरजिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांनी ओमी कलानी यांना तीन अपत्ये असल्याची तक्रार केली होती. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी ओमी यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवला. त्यामुळे ते निवडणूक रिंगणाबाहेर पडले. या प्रकारामुळे दोघांतील संबंध ताणले गेले आहेत. त्यांच्या समर्थकात हाणामारी होऊ नये, म्हणून १५ दिवसांपासून या प्रभागात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सोमवारी दुपारी ३ वाजता ओमी व भाजपाचे उमेदवार दिनेश रॉय यांच्यावर अनोळखी व्यक्तीने चाकू हल्ला केला. या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे. त्यामुळे पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.भगवान भालेराव यांच्या समर्थकांनी हा हल्ला केल्याचा आरोप दिनेश रॉय यांनी केला. तर भालेराव यांनी हा राजकीय स्टंट असल्याची प्रतिक्रिया दिली. पोलीस अधिक चौकशी करत असून, अजूनही गुन्हा दाखल झालेला नाही. (प्रतिनिधी)
ओमी कलानी, भाजपा उमेदवारावर चाकूहल्ला
By admin | Updated: February 21, 2017 05:57 IST