मीरा रोड : कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे टोकन नगरसेवक स्वतःच्या कार्यालयातून वाटत असल्याचा व्हिडिओ व ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने डॉक्टरांना नोटीस बजावली आहे.
लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रांवर दिले जाणारे महापालिकेचे टोकन भाजपचे नगरसेवक ध्रुवकिशोर पाटील हे स्वतःच्या खाजगी कार्यालयात बसून देत असल्याचा धक्कादायक प्रकार एका व्हायरल व्हिडिओ व ऑडिओ क्लिपने समोर आला आहे. यामध्ये नगरसेवक त्यांच्या कार्यालयात बसून पालिकेची टोकन देऊन टेंबा येथील लसीकरण केंद्रावर जाण्यास सांगत आहेत. या क्लिपमुळे लसीकरणासाठी चालणारा टोकन घोटाळा पुन्हा चर्चेत आला आहे. यावर लोकांंकडून टीका होत असून, गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
महापालिकेच्या लसीकरण मोहिमेत संगनमताने काही नगरसेवक, राजकारणी वशिलेबाजी व गैरप्रकार करत असल्याचे आरोप सतत होत आहेत. काही प्रकार उघडकीस येऊनसुद्धा महापालिका मात्र कारवाईऐवजी गैरप्रकारांना पाठीशी घालत आहे.
‘लोकमत’ने टोकन घोटाळ्याचे वृत्त दिल्यावर महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार वैद्यकीय विभागाने टेम्बा लसीकरण केंद्राचे प्रमुख डॉ. भूषण पाटील यांना नोटीस बजावून खुलासा करण्यास सांगितले आहे. मात्र, प्रशासन लाचार बनले असून, त्यांची नगरसेवक वा राजकारण्यांवर कारवाईची हिंमत नाही. ते फक्त सामान्य लोकांवरच कारवाईचा बडगा उगारून मर्दुमकी दाखवते, अशी टीका माजी नगरसेवक रोहित सुवर्णा यांनी केली आहे.