लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : ग्रामीण परिसरात कोलवली गावातील विनापरवाना बर्फ बनवणाऱ्या कंपनीला अन्न आणि औषध प्रशासनाने नोटीस बजावली असून खाण्यास अयोग्य असलेला २ हजार ९९६ किलो बर्फ अधिकाऱ्यांनी नष्ट केला.दापोडा येथील कृष्णा कॉम्प्लेक्समध्ये गाळा क्रमांक ८ मध्ये सुरू असलेल्या आरजी आइस फॅक्टरीमध्ये खराब पाण्यापासून बर्फ बनवला जात असल्याचे समजल्यानंतर शनिवारी दुपारी अन्न व औषध विभागाचे सहआयुक्त एम.एन. चौधरी, अन्नसुरक्षा अधिकारी यू.एस. लोहकरे व अन्न सुरक्षारक्षक आर.डी. आक्रुपे यांनी छापा टाकून बर्फाचे नमुने घेतले. तेव्हा प्रथमदर्शनी तो बर्फ खाण्यास धोकादायक असल्याने २ हजार ९९६ किलो बर्फ नष्ट केला. तसेच नमुने तपासल्यानंतर त्यानुसार कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.भिवंडी-वाडा रस्त्यावर कोलवली गावात असलेल्या रीमा आइस अॅण्ड कोल्ड स्टोअरेज या कंपनीला भेट देऊन परवान्याची चौकशी केली असता कंपनीमालकाकडे बर्फ बनवण्याचा कोणताही परवाना नसल्याचे आढळले. या कंपनीच्या बर्फाचे नमुने घेऊन विनापरवाना कंपनी सुरू ठेवल्याप्रकरणी मालकास नोटीस दिल्याची माहिती सहआयुक्त चौधरी यांनी दिली. या घटनेमुळे शहरातील बेकायदा बर्फ व आइस्क्रीम बनवणाऱ्या कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत.
विनापरवाना बर्फ बनवणाऱ्या कंपनीस नोटीस
By admin | Updated: May 9, 2017 01:03 IST