- सदानंद नाईक, उल्हासनगर
सेक्स रॅकेट चालवताना पकडल्या गेलेल्या शहर महिला विभाग संघटक शोभा गमलाडू या आमच्या पक्षाच्या नव्हेत, असा पवित्रा शहर शिवसेनेने घेतला आहे. विधानसभेच्या निवडणुकीत पक्षविरोधात काम केल्याप्रकरणी त्यांची सहा महिन्यांपूर्वीच पक्षातून हकालपट्टी केल्याची माहिती शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी व शहर महिला संघटक मनीषा भानुशाली यांनी दिली. मात्र, त्यानंतरही त्या शिवसेनेच्या पोस्टर्सवर कशा झळकतात, असा प्रश्न विरोधकांनी केला असून त्यावर शिवसेनेच्या नेत्यांनी मौन बाळगले आहे. उल्हासनगर महापालिकेत शिवसेना-भाजपा व रिपाइंची सत्ता असून विधानसभा निवडणुकीदरम्यान शोभा गमलाडू यांना शिवसेनेत प्रवेश दिला. त्यांना महिला विभाग संघटकपद दिले गेले. विधानसभा निवडणुकीत त्यांनी पक्षविरोधात काम केल्याची माहिती वरिष्ठांपर्यंत गेली होती. पण, त्यानंतरही त्या पक्षाच्या पोस्टरवर झळकत होत्या. त्या कारणास्तव सहा महिन्यांपूर्वी त्यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचा पवित्रा सेक्स रॅकेटनंतर शिवसेनेने घेतला आहे. शिवसेनेला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त विविध कार्यक्रम साजरे झाले. त्याच्या पोस्टरमध्येही त्या होत्या. त्या वेळी शिवसेनेने आक्षेप का घेतला नाही, असा प्रश्न विरोधकांनी विचारला आहे.कॅम्प नंबर-१ परिसरात गमलाडू कार्यरत होत्या. विधानसभेच्या निवडणुकीवेळी त्यांनी शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला. त्यांच्यावर सेक्स रॅकेटचा गुन्हा दाखल झाल्याने शहर शिवसेनेची प्रतिमा डागाळली. त्याचा संदर्भ देत शिवसेनेत अनेक वाल्याचे वाल्मीकी झाले असून त्यांची पक्षातून हकालपट्टी करणार का, असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला आहे.