ठाणे : सत्ताधारी शिवसेना आणि ठाणे महानगरपालिका प्रशासनाने कधी विकासकांच्या फायद्यासाठी, तर कधी मेट्रो रेल्वेसाठी सुमारे तीन हजार वृक्षांची कत्तल करण्याचा ठराव पारित केला आहे. त्याला उत्तर म्हणून गांधीगिरी करून ठाणे शहराच्या विविध भागांत सुमारे नऊ हजार वृक्षांचे स्वखर्चाने रोपण करून ते वाढवण्याचा संकल्प राष्ट्रवादी काँग्रेसने वर्धापन दिनाच्या अनुषंगाने सोडला. त्याची सुरुवात सोमवारी अयप्पा मंदिरामागील डोंगरावर झाडांची लागवड करून केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली तसेच प्रदेश सरचिटणीस तथा ज्येष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला, चिटणीस तथा ज्येष्ठ नगरसेवक सुहास देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या उपक्र माला सुरु वात करण्यात आली. अयप्पा डोंगरामागे असलेल्या वनखात्याच्या डोंगरावर सोमवारी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी १०० झाडांचे रोपण केले. तसेच, ही झाडे जगवण्याची शपथही घेतली. याप्रसंगी बोलताना राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी सांगितले की, ठाणे महानगरपालिका प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेनेने संगनमत करून ठाणे शहरातील पर्यावरणाला धोका निर्माण केला आहे. शहरात सत्ताधारी आणि प्रशासन बेलगाम वृक्षतोड करत असल्याने मोठा भविष्यात मोठा धोका आहे. कधी मेट्रोच्या नावावर तर कधी विकासकांच्या फायद्यासाठी, गेल्याच महिन्यात तीन हजार झाडे ठाणे शहरात तोडण्यात आली. सोमवारी पक्षाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आम्ही सर्वांनी नऊ हजार झाडे ठाणे शहरात लावण्याचा वसा घेतल्याचेही त्यांनी सांगितले.