लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : पावसाळ्यादरम्यान ठाणे जिल्ह्याला विविध प्रकारच्या आपत्तींचा सामना करावा लागतो. त्यावर तत्काळ मात करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व नियंत्रण कक्षाला यंदा एनडीआरएफच्या पथकाची ताकद मिळणार आहे. जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात एनडीआरएफच्या जवानांची तुकडी ठाण्यात हजर होणार आहे. जिल्ह्यातील आपत्तीच्या कोणत्याही ठिकाणी त्यांना सहज पोहोचता यावे, म्हणून त्यांची निवासव्यवस्था घोडबंदर परिसरात ठाणे महापालिकेकडून करण्यात आली आहे. याशिवाय, ठाणे जिल्ह्यातील सर्व महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, प्रांत व तहसीलदार कार्यालयांमध्ये १ जूनपासून नियंत्रण सुरू करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापन व नियंत्रण कक्षांच्या आढावा बैठकीत सोमवारी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीत या ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सखोल मार्गदर्शन करून प्रत्येकाने आपापल्या जबाबदारीनुसार सतर्क राहून पावसाळ्यातील आपत्तीवर वेळीच मात करण्याचे सूचित केले. या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी वंदना सूर्यवंशी यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. या बैठकीस महापालिका, नगरपालिका, आरोग्य विभाग, कृषी विभाग, जलसंपदा तसेच जिल्हा परिषद यांचे प्रतिनिधी, प्रांताधिकारी, तहसीलदार, आदी उपस्थित होते.ठाणे शहर व जिल्ह्यात गेल्या वर्षी पर्यटनस्थळी धबधब्याखाली काही जण वाहून गेल्याची घटना घडली आहे. माळशेज घाटाचा रस्ता खचणे तसेच भिवंडी व परिसरात धोकादायक इमारती पडण्याचे प्रसंग उद्भवले आहेत. पावसाळ्यात पाणी तुंबल्याने किंवा इतर तांत्रिक समस्यांचा अनुभव लक्षात घेत पावसाळ्यातील आपत्तीवर मात करण्यासाठी आराखडा तयार करण्यास या वेळी सांगण्यात आले. आपत्ती व नियंत्रण कक्षासाठी प्रत्येक कार्यालयाने दोन नोडल कर्मचाऱ्यांची तत्काळ नियुक्ती करणे अपेक्षित आहे. आवश्यक ते प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना देऊन शाळा-महाविद्यालयांतील एनएसएस आणि एनसीसीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्याचे या बैठकीत निश्चित करण्यात आले.
जिल्हा आपत्ती कक्षाला एनडीआरएफची ताकद
By admin | Updated: May 9, 2017 01:01 IST