मीरा रोड : मीरा-भार्इंदर महापालिका आयुक्तांनी ३० एप्रिलपासून नवीन नळजोडण्यांसाठीचे अर्ज आॅनलाइनसह आॅफलाइन देण्याची तयारी चालवली असताना भाजपाने चक्क आपल्या कार्यालयामधून पालिकेच्या अर्जांचे वाटप करण्याचा घाट घातला जात आहे. नळजोडणीबद्दल बॅनरबाजीसह सोशल मीडियावर प्रसिद्धी चालवली आहे. शिवसेनेनेही त्याला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली असून काँग्रेस नगरसेवकांनीही नळजोडणीचे प्रत्येकी ५०० अर्ज आयुक्तांकडे मागितले आहेत. त्यातच, ३० एप्रिलला जलसंपदामंत्र्यांच्या हस्ते अर्जवाटपाचा कार्यक्रम भाजपाचा असल्याची जाहिरातबाजी सुरू झाल्याने नळजोडणी प्रकरण चिघळण्याची चिन्हे आहेत. पुरेसे पाणी नसल्याने सहा वर्षांपासून महापालिकेने शहरात नवीन नळजोडण्या देणे बंद केले होते. नळजोडण्या देणे बंद करताना बिल्डरांचे हित जोपासत टॉवरना परवानगी देणे मात्र सर्रास सुरूच ठेवण्यात आले. यामुळे येथे राहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना पालिकेच्या नळजोडणीपासून वंचित राहावे लागत आहे. त्यांना पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. आघाडी सरकारच्याकाळात मंजूर झालेले एमआयडीसी कोट्यातील ७५ दशलक्ष लीटर पाणीयोजनेचे काम आता युतीच्या काळात पूर्णत्वास येत आहे. सुरुवातीला २५ दशलक्ष लीटर पाणी टप्प्याटप्प्याने येणार असून आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी ३० एप्रिलपासून नवीन नळजोडणीसाठी अर्ज स्वीकारण्याचे जाहीर केले होते. त्यातच, आॅगस्टमध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या तोंडावर मतदारांना आकर्षित करण्यासाठी नवीन नळजोडण्या देण्याचे श्रेय लाटण्याची धडपड भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांनी चालवली आहे. दुसरीकडे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश वाकोडे यांनी या वृत्ताचा इन्कार केला आहे. तर नवीन नळजोडणी अर्जाबाबत आयुक्तांकडे बैठक होणार असून त्यात सर्वच बाबींवर चर्चा होऊन आयुक्त देतील, त्या आदेशाप्रमाणे कार्यवाही केली जाईल. नळजोडणी अर्ज पालिका स्तरावरच दिले जातील, असे म्हटले आहे. (प्रतिनिधी)भाजपाचे नगरसेवक वा पदाधिकारी आदी कुणाच्याही कार्यालयातून नळजोडणीचे अर्ज मिळणार नाहीत. ती प्रशासकीय बाब आहे. जनजागृती व्हावी व आवश्यक मार्गदर्शन भाजपाकडून केले जात आहे. - हेमंत म्हात्रे, जिल्हाध्यक्ष, भाजपा पालिकेचे काम प्रशासन करत नसून केवळ एकाच व्यक्तीच्या इशाऱ्यावर चालत आहे. सध्या बंगल्यावरून चालणारे पालिकेचे कामकाज उद्या भाजपा कार्यालयामधून सुरू झाले, तर आश्चर्य वाटायला नको. - प्रमोद सामंत, नगरसेवक, काँग्रेसशिवसेनेच्या प्रयत्नांमुळेच पाणी येत आहे. नळजोडणी देण्याचे काम प्रशासकीय बाब असून पारदर्शकतेच्या गप्पा मारणाऱ्यांनी निव्वळ राजकीय फायद्यासाठी लोकहिताच्या कामात अडथळे आणणे बंद करावे. अर्जवाटप कार्यक्रम पालिकेने ठरवला नसताना भाजपाकडून परस्पर त्याची होणारी जाहिरातबाजी बेकायदा आहे. - प्रवीण पाटील, उपमहापौर
पालिकेचे अर्ज भाजपा कार्यालयात
By admin | Updated: April 22, 2017 02:31 IST