भार्इंदर : पावसाळा सुरू झाला तरी कंत्राटी कामगारांना रेनकोट, चप्पल अशा आवश्यक वस्तूच देण्यात आल्या नाहीत. या मागण्यांसाठी मुसळधार पावसात साफसफाईचे काम सुरू ठेवत सफाईकामगारांसह उद्यान विभागातील मजुरांनी श्रमजीवी कामगार संघटनेचे विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखाली अर्धनग्न अवस्थेत सोमवारी आंदोलन केले. या आंदोलनाचे पडसाद पालिकेसह शहरात आणि सोशल मीडियावरही उमटले. पालिका आणि लोकप्रतिनिधींविरोधात टीकेची झोड उठली. पालिकेने देखील तातडीची बैठक बोलावून रेनकोट, चप्पल दोन दिवसांत देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन दुपारी साडेबाराच्या सुमारास मागे घेण्यात आले. तर पालिकेने पैसे दिले नाही म्हणून विलंब झाल्याचे ठेकेदाराने म्हटले.महापालिकेने दैनंदिन कचरा आणि लहान गटार सफाईच्या कामासाठी ठेकेदार नियुक्त केला असून त्यामार्फत १६०० कंत्राटी कामगार शहरात साफसफाईचे काम करतात. तर उद्यान विभागातील कामांसाठी २६० कंत्राटी मजूर आहेत. सफाई कामगार आणि मजुरांना पावसाळ्याआधी रेनकोट, चप्पल यांसोबतच गणवेश, हातमोजे, मास्क आदी आवश्यक साहित्य द्यायला हवे.पावसाळा सुरू झाला तरी या कंत्राटी कामगारांना रेनकोट, चप्पल आदी आवश्यक वस्तूच दिल्या नाहीत. सफाई कामगारांना वर्षातून २ वेळा गणवेश द्यायचा असताना ६ वर्षात ३ वेळाच गणवेश दिला गेला. त्यामुळे सोमवारी सकाळपासून सफाईकामगार आणि मजुरांनी अर्धनग्न अवस्थेतच सफाईचे काम सुरू केले. भर पावसात भिजत उघड्याने शहर स्वच्छ करणाऱ्या तसेच पावसाने पडलेली झाडे बाजूला करणाºया मजुरांना पाहून नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. अनेकांनी त्यांचे छायाचित्र, चित्रीकरण सोशल मीडियावर शेअर केले.दरम्यान, आयुक्त बालाजी खतगावकर यांनी याबाबत आपल्या दालनात तातडीने बैठक बोलावली. विवेक पंडितांसह अन्य पदाधिकारी आणि हे अर्धनग्न अवस्थेतील कामगार उपस्थित होते. तर पालिकेचे संबंधित अधिकारी व ठेकेदारांचे प्रतिनिधी देखील होते. पालिकेने ३ वर्षांपासून पैसे थकवल्याचे सांगत रेनकोट, चप्पल आदी देण्यास विलंब झाल्याचे ठेकेदाराने स्पष्ट केले. तर आयुक्तांनी ठेकेदारांना थकीत पैसे देण्याचे आश्वासन देत कामगाराना तातडीने रेनकोट, चप्पल देण्याचे निर्देश दिले. आजपासूनच रेनकोट वाटप सुरु करणार असून चांगल्या कंपनीची चप्पल दोन दिवसात देऊ. गणवेश ५ दिवसात शिवून येतील असे आश्वासन ठेकेदारांच्या वतीने देण्यात आले.
सफाई कामगारांचे अर्धनग्न अवस्थेत आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 01:19 IST