ठाणे : सोमवारी सुट्टी असताना स्थानिक स्वराज्य संस्थापाठोपाठ ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने सुरू ठेवलेल्या कार्यालयात थकीत करापोटी सुमारे २ कोटींची रक्कम जमा झाली आहे. हे पैसे अवघ्या साडे सहा तास सुरू ठेवलेल्या वेळेत जमा झाले असून सर्वाधिक थकीत कराची रक्कम ठाणे विभागीय कार्यालयातील आहे. यामध्ये सर्वाधिक पाचशे रुपयांच्या नोटांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली.शासनाच्या आदेशानुसार ठाणे विभागाचे आरटीओ अधिकारी जीतेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे, कल्याण, नवी मुंबई आणि वसई या चार विभागीय कार्यालयातील उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी सुटी असताना कार्यालये सकाळी ९.३० ते दुपारी ३ वेळेत थकीत कर वसूलीसाठी सुरू ठेवली होती. तसेच थकीत करापोटी हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा स्वीकारल्या जाणार असल्याचे आवाहन आरटीओने केले होते. त्यानुसार, कर थकवणाऱ्या बस आणि ट्रक (गुड्स) धारकांनी रांगा लावून पैसे भरले आहेत. सर्वाधिक ७३ लाख ६९ हजार २९३ रुपये जमा झालेल्या ठाणे विभागीय कार्यालयापाठोपाठ नवी मुंबईत ६१ लाख ३८ हजार २९२, वसई- ३९ लाख १३ हजार १०० आणि कल्याणमध्ये १९ लाख ४५ हजार असे एकूण १ कोटी ९३ लाख ६५ हजार ६८५ रुपये जमा झाल्याची माहिती आरटीओने दिली. (प्रतिनिधी)
सर्वाधिक वसुली ठाणे विभागात
By admin | Updated: November 16, 2016 04:26 IST