ठाणे : सर्व जागा लढवण्याचा दावा करणाऱ्या मनसेच्या १११ उमेदवारांनी शुक्रवारी अर्ज भरले. यात पक्षाने एका प्रकरणात हरकत घेतलेल्या विद्यमान नगरसेविका राजश्री नाईक यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे, तर गतवर्षी निवडणूक लढलेल्या उर्वरित तीन उमेदवारांनाही पुन्हा लढण्याची संधी मिळाली आहे. अनेक नवे चेहरे या रणधुमाळीत उतरले आहेत. इच्छुक २९० उमेदवारांच्या मुलाखती काही दिवसांपूर्वी घेण्यात आल्या. आम्ही सर्व जागा लढवू, असा दावा पक्षाने केला होता. यात १२१ जणांचा यादीत समावेश असेल, असे पक्षाकडून गुरुवारपर्यंत सांगण्यात येत होते. परंतु, शुक्रवारी प्रत्यक्षात मात्र १११ उमेदवारांनी अर्ज भरले. अनेकांकडे जातपडताळणी प्रमाणपत्र नसल्याने त्यांचे अर्ज भरण्यात आले नसल्याचे कारण पक्षाने दिले. प्रभाग क्रमांक २६ मधून एकाही उमेदवाराने अर्ज भरलेला नाही. चार सदस्यांचा एक प्रभाग असला तरी मनसेतून सर्वच प्रभागांत चारही उमेदवारांनी अर्ज भरले नाहीत. प्रभाग क्रमांक ३२ मधून दोन उमेदवारांनी, तर प्रभाग क्रमांक ३३ मधून एका उमेदवाराने अर्ज भरला आहे. (प्रतिनिधी)
मनसेत बहुतांश नवे चेहरे
By admin | Updated: February 4, 2017 03:32 IST