ठाणे :दोन वर्षे प्रभाग सुधारणा निधीतून नगरसेवकांचे १० लाख रुपये पालिकेने त्यात्या प्रभागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी घेतले होते. परंतु, हे कॅमेरे लागलेच नसून हा निधीही लॅप्स झाल्याची बाब गुरुवारी झालेल्या महासभेत उघड झाली. अशाप्रकारेदोन वर्षांचा १३ कोटींचा प्रभाग सुधारणा निधी लॅप्स झाला असून या मुद्यावरून लोकप्रतिनिधींनी प्रशासनाच्या भूमिकेवरच संशय घेऊन सभागृहात गोंधळ घातला. नेहमीप्रमाणे प्रशासनाची बाजू सावरून आयुक्तांनी जागतिक स्तरावरील तंत्रज्ञान वापरून कमांड अॅण्ड कंट्रोल सेंटर उभारल्यानंतरच सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय झाला असून त्यामुळेच सीसीटीव्ही कॅमेरे बसवले नसल्याचे स्पष्ट केले आहे. गुरु वारी सर्वसाधारण सभा सुरू झाल्यानंतर शिवसेनेच्या नगरसेविका रुचिता मोरे यांनी प्रश्नोत्तराच्या तासामध्ये त्यांच्या प्रभागामध्ये प्रभाग सुधारणा निधीच्या माध्यमातून किती सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले, असा प्रश्न उपस्थित केला. मात्र, अधिकाऱ्यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. कॅमेरे बसवले नाहीत तर नाहीत, हा निधी कुठे, असा प्रश्न मोरे यांच्यासमवेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी केला. २०१५-१६ आणि २०१६-१७ या दोन वर्षांत प्रत्येक नगरसेवकाकडून यासाठी १० लाखांचा निधी घेतला होता. मात्र, प्रत्यक्षात एकही कॅमेरा शहरात लागला नसल्याने नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेऊन प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. सीसीटीव्ही कॅमेरा घेण्यासाठी घेतलेला निधी खर्च केला नसला तो २०१७-१८ मध्ये वर्ग केल्याची माहिती विद्युत विभागाने दिली. मात्र,भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक पाटणकर यांनी २०१७-१८ या वर्षी यासाठी तरतूदच केली नसल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणले. (प्रतिनिधी)
पैसे तर घेतले पण सीसीटीव्ही लागलेच नाही
By admin | Updated: April 21, 2017 00:11 IST